नागपूर :- धुक्यामुळे दिसेनासे झाल्याने चार विमानांना अवकाशी घिरट्या घालून घालून हैदराबादच्या विमानतळाऐवजी शेवटी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले. वाईट वातावरणामुळे एकावेळी चार विमानांना हैदराबादऐवजी नागपुरात उतरवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही चारही विमाने इंडिगो एअरलाइन्सची असून त्यात दोन विदेशी उड्डाणांचाही समावेश आहे.
सोमवारी सकाळी इंडिगोचे विमान ६-ई ५०१२ मुंबईहून हैदराबादसाठी झेपावले. मात्र, हैदराबादला दाट धुके असल्याने पायलटने हे विमान तेथून वळविले आणि नंतर नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्याच्या काही मिनिटांनंतर ६ ई ४९५ चेन्नई हैदराबाद हे दुसरे विमानही नागपूरला लॅण्ड झाले. त्यानंतर साैदी अरबच्या दम्माम येथून हैदराबादला निघालेले ६ ई ८६ हे विमान आणि कतरच्या दोहा येथून हैदराबादला जाणारे ६ ई १३१८ हे विमानसुद्धा नागपूरलाच उतरविण्यात आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी हैदराबादमध्ये एवढे दाट धुके होते की, विमानतळावर काहीच दिसत नव्हते. लो व्हिजिबिलिटीमुळे हैदराबादच्या विमानतळावर टेक ऑफ आणि लॅण्डिंगची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे ४५ विमानसेवा प्रभावित झाल्या.
दीड तासानंतर हैदराबादकडे रवाना
दम्माम आणि दोहा येथून पहाटे १:४० आणि २ वाजता हैदराबादकडे येण्यासाठी विमान झेपावले. ते सोमवारी सकाळी ७:५० ला हैदाराबादला पोहोचणार होते. मात्र, सदोष वातावरणामुळे ही विमाने तेथे न उतरवता नागपुरात उतरविण्यात आली. त्यामुळे या विमानातील प्रवाशांना चहा-नाश्ता देण्यात आला की नाही, असा प्रश्न इंडिगोच्या स्थानिक स्टेशन मॅनेजरला केला असता त्यांनी त्याचे उत्तर देण्याचे टाळले. दरम्यान, येथील विमानतळावर सुमारे दीड तास थांबल्यानंतर प्रवाशांना घेऊन ही चारही विमाने हैदराबादकडे रवाना झाली.