Ø निवडणूक निरिक्षकांचा राजकीय पक्षांशी संवाद
Ø जिल्ह्यात सामान्य, खर्च व पोलिस निरिक्षक दाखल
यवतमाळ :- जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक नि:पक्ष, निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी आयोगास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्यात दाखल झालेल्या निरिक्षकांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले.
महसूल भवन येथे निरिक्षकांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी निवडणूक चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी संवाद साधला. यावेळी यवतमाळ व दिग्रस मतदारसंघाच्या निरिक्षक ए.श्रीदेवासेना, पुसद, आर्णी व उमरखेडचे निरिक्षक सत्येंद्र कुमार, वणी व राळेगावचे निरिक्षक सज्जन आर., पोलिस निरिक्षक एस.के.तिवारी, वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रसचे खर्च निरिक्षक अश्विनी कुमार सिंगल, आर्णी, पुसद, उमरखेडचे खर्च निरिक्षक निखील कुमार सिंग, जिल्हाधिकारी डा.पंकज आशिया, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर उपस्थित होते.
निवडणूक नि:पक्ष, निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने विविध प्रकारचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. निवडणूक घेणाऱ्या यंत्रनेसह राजकीय पक्षांसाठी देखील सदर निर्देश फार महत्वाचे आहे. सर्वांनी या निर्देशांचे पालन केले पाहिजे. उमेदवार किंवा पक्षांनी राजकीय सभा, प्रचार रली यासह विविध बाबींसाठी पुर्व परवाणगी घ्यावी. आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आपली सगळ्यांची सामुहिक जबाबदारी आहे. त्याचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता घेतली जावी.
पोलिस विभागाशी संबंधित काही विषय असल्यास उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी आवर्जुन मांडावा. निवडणूक काळात जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही आणि निवडणूक शांततेत पार पडेल, यासाठी सर्वांनी सोबत काम केले पाहिजे. निवडणूक निरिक्षक उमेदवार तसेच पक्षांसाठी नेहमीच उपलब्ध राहणार असून कोणताही संकोच न बाळगता संपर्क साधावे, असे आवाहन देखील राजकीय पक्षांना निरिक्षकांनी केले.
सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सर्व निरिक्षकांना जिल्ह्याची माहिती तसेच निवडणूक विषयक तयारीची माहिती दिली. त्यानंतर निरिक्षकांनी निवडणूक विषयक कामकाजाचा सर्व जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. ईलेक्ट्रानिक मतदान यंत्र, मनुष्यबळ, वाहन व्यवस्था, पोस्टल बॅलेट, साहित्य वाटप, कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदार जनजागृती आदींचा आढावा घेतला.