– 51 पूज्य भन्तेजी देणार बुद्धांच्या मानवतेचा संदेश
नागपूर :- केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होणार असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी ‘परित्राण पाठ’चे आयोजन करण्यात येत आहे. या परित्राण पाठच्या आयोजना संदर्भात माजी नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
बैठकीत माजी नगरसेवक संदीप गवई, सतीश सिरसवान, आशिष वांदिले, सुधीर जांभुळकर, भैय्यासाहेब दिघाने, वंदना भगत, नागेश सहारे, रमेश वानखडे, नेताजी गजभिये, उषा पॅलेट, शंकर मेश्राम, महेंद्र प्रधान, इंद्रजित वासनिक, हिमांशू पारधी आदी उपस्थित होते.
क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानामध्ये 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता परित्राण पाठ आयोजित करण्यात आले आहे. 51 पूज्य भन्तेजी मानवी कल्याणाचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा संदेश या परित्राण पाठ च्या माध्यमातून नागपूरच नव्हे तर संपूर्ण देशभर प्रसारित करतील. बैठकीत माजी नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी कार्यक्रम अधिकाधिक प्रमाणात यशस्वी करण्याविषयी संबोधित केले. नागपूर शहरातील सर्व बौद्ध विहारांमधील पूज्य भन्तेजींचे मार्गदर्शन घेऊन कार्यक्रमाबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
ऍड. मेश्राम यांच्यासह अशोक मेंढे, डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, संदीप गवई, सतीश सिरसवान, प्रमोद तभाने, नागेश सहारे, वंदना भगत, आशिष वांदिले यांनी सर्व उपासक उपासिकांनी शुभ्र वस्त्रं परिधान करून मोठ्या प्रमाणावर ह्या परित्राण पाठ कार्यक्रमात सामील व्हावे असे आवाहन केलेले आहे.