– अ. भा. पाली परिषद संपन्न
नागपूर :- तथागत बुद्धांच्या उपदेशामुळे त्याकाळची सामान्य बोली साहित्याची भाषा बनली. बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसार सोबतच पाली भाषा सुद्धा प्रसारित होत राहिली. त्यामुळे बौद्ध संस्कृती सुद्धा विदेशात पोहोचली. थायलंड, श्रीलंका, म्यानमार यासारख्या अनेक देशात आज पाली भाषा प्रचलित आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की पाली भाषा वैश्विक आहे. या भाषेतील ज्ञान जाणून घेण्यासाठी पाली भाषेचे विविध स्तरावर संशोधन होणे आवश्यक आहे असे मत नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांनी व्यक्त केले.
ते पाली प्राकृत विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. मधुकरराव वासनिक पी.डब्ल्यू.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नागपूर आणि पटिपदा बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित पाली प्रचारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय पाली परिषदेत उद्घाटकीय सत्राच्या अध्यक्षस्थाना वरून बोलत होते. अभिजात पाली भाषा या विषयावर पाली परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी डॉ. भागचंद्र जैन, बीजभाषक डॉ. महेश देवकर पुणे, डॉ. प्रज्ञा बागडे, विभाग प्रमुख डॉ. नीरज बोधी, डॉ. प्रतिभा गेडाम उपस्थित होते. या प्रसंगी पाली भाषेतील योगदानाबद्दल डॉ. महेश देवकर यांना पालीभूषण पुरस्कार, डॉ. भागचंद्र जैन यांना पाली गुणसागर पुरस्कार, डॉ. जयवंत खंडारे यांना पालीरत्न पुरस्कार, डॉ. तलत प्रवीण यांना पाली कोविद पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय उद्बोधनात प्र. कुलगुरू डॉ. काकडे पुढे म्हणाले की, पाली भाषेतील बुद्धांचा विचार हा जगाला शांती आणि स्थैर्य देणारा आहे. प्रो. भागचंद्र जैन यांनी पाली ही प्राचीनतम आहे त्यामुळे या भाषेचा प्रचार प्रसार होणे हे काळाची गरज आहे असे वक्तव्य केले. त्या भाषेच्या विकासाकरिता सरकारने विशेष प्रयत्न करावे असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. प्रो. महेश देवकर यांनी परिषदेचे बीजभाषण सादर केले. आपल्या बीजभाषणामध्ये त्यांनी पालीच्या अभिजात भाषेचे स्वरूप स्पष्ट केले. यासाठी त्यांनी पालीचा बुद्ध काळापासून तर वर्तमान काळापर्यंतचा संपूर्ण आढावा घेतला. सोबतच पाली भाषेतील साहित्याची उपयोगिता याविषयी विस्तृत विवेचन केले.
पालीला अभिजात स्वरूप प्रदान करत असताना पालीचे मूळ स्वरूप हे त्यापासून अभिन्न राहू नये याची सुद्धा दक्षता त्यांनी या ठिकाणी घेतली. पालीचे स्वरूप बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
या परिषदेमध्ये तीन सत्र संपन्न झालेत. या तिन्ही सत्रांमध्ये संशोधकांनी आपले संशोधन पत्राचे वाचन केले. यातील प्रथम व द्वितीय सत्राची अध्यक्षता प्रो. महेश देवकर यांनी केली. या सत्रामध्ये डॉ. तलत प्रविण, डॉ. जयवंत खंडारे, प्रा. सरोज वाणी, प्रा. नेहा गजभिये, डॉ. मोहन वानखडे, डॉ. ज्वाला डोहाणे, प्रा. लालदेव नंदेश्वर, आचार्य महानाग रत्न जुमडे यांनी शोध पत्र सादर केले. तृतीय सत्राची अध्यक्षता डॉ. तलत प्रवीण यांनी केली. या सत्रामध्ये डॉ. बिना नगरारे, डॉ. प्रतिभा गेडाम, कविता जनबंधू, किशोर भैसारे, योगिता इंगळे यांनी शोध पत्र सादर केले.
यावेळी मुख्य पाहुण्यांच्या हस्ते डॉ ज्वाला डोहाने लिखित भारतात बुद्ध धम्माचा उदय, विकास, लोप व पुनरुत्थान या पुस्तकाचे तसेच डॉ रेखा बडोले यांच्या पाली व्याकरणाच्या अनुवादित पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले.
समारोपीय सत्राचे अध्यक्ष डॉ. पुरणचंद मेश्राम, माजी कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर हे होते. आपले वक्तव्य सादर करत असताना ते म्हणाले की पालीला जनसामान्या पर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. पाली ही लोक चळवळ झाली पाहिजे,असे त्यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी मा. सुनील इंगळे आणि डॉ. प्रज्ञा बागडे यांनी मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. समारोपीय सत्रामध्ये अनेक ठरावांचे वाचन विभाग प्रमुख डॉ. निरज बोधी यांनी केले आणि हे ठराव सर्वानुमते पारित झाले.
उद्घाटकिय सत्राचे संचालन डॉ. सुजित वनकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. लालदेव नंदेश्वर यांनी केले. समारोपीय सत्राचे संचालन प्रा. नेहा गजभिये यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. रेखा बडोले यांनी केले. या परिषदेला उत्तम शेवडे, भीमराव कांबळे, नरेश मेश्राम, सखाराम मंडपे, महेंद्र कौसल यासह अनेक आजी-माजी विद्यार्थी आणि संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.