नागपूर :- नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या ग्राहकांना त्वरीत वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी महावितरणतर्फ़े सुरु करण्यात आलेल्या मोहीमे अंतर्गत 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या वर्षभरात नागपूर परिमंडलातील तब्बल 62 हजार 243 ग्राहकांच्या घरात वीज देत महावितरणने त्यांचे आयुष्य प्रकाशमय केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडलात ‘इज ऑफ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत.यात मागिल वर्षभरात नागपूर शहर मंडलातील 36 हजार 342, नागपूर ग्रामिण मंडलातील 16 हजार 954 आणि वर्धा मंडलातील 8 हजार 747 घरगुती ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या गेल्या आहेत. यात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 9 हजार 981 वीज जोडण्या या कॉग्रेसनगर विभागात तर त्याखालोखाल महाल विभागात 7 हजार 895 वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय सिव्हील लाईन्स विभागात 7 हजार 91, बुटीबोरी विभागात 6 हजार, गांधीबाग विभागात 5 हजार 639, मौदा विभागात 8 हजार 58, सावनेर विभागात 3 हजार 986, उमरेड विभागात 2 हजार 646, काटोल विभागात 2 हजार 264 ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय वर्धा जिल्ह्यातील वर्धा विभागात 4 हजार 303, आर्वी विभागात 2 हजार 285 तर हिंगणघाट विभागात 2 हजार 159 घरगुती ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
तात्काळ वीजजोड
‘महावितरण’कडून ‘इज ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत नागपूर परिमंडलात नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभुत सुविधा उपलब्ध असलेल्या भागात मागेल त्यास ताबडतोब नवीन वीजजोड देण्यात येत आहे. शक्य असल्यास विलंब न करता शहरी आणि ग्रामीण भागांत 24 ते 48 तासांत नवीन वीजजोड कार्यान्वित होत आहे. अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेमधून वीजभाराच्या मागणीसह जोडणी देणे शक्य आहे, अशा ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि रकमेचा भरणा केल्यास 24 ते 48 तासांत नवीन जोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे. ‘महावितरणच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ चा लाभ घेत ग्राहकांनी देखील नवीन वीज जोडणी घेतल्यानंतर त्यांच्या वीज बिलांचा भरणा ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमाने नियमित करुन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.