नागपूर :- खेलो इंडिया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा नुकत्याच उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये नागपूर विद्यापीठाच्या योगासन संघाने महिला गटामध्ये सुवर्णपदक तर पुरूष गटाने रजतपदक पटकावले. या विद्यापीठ संघामध्ये कमला नेहरू महाविद्यालयाची खेळाडू अलिशा गायमुखे हिचा समावेश होता. तसेच पुरूष गटामध्ये वैभव श्रीरामे व वैभव देशमुख यांचा समावेश होता. विजयी संघामध्ये या सर्व खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट राहिली.
अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी यांच्या शुभहस्ते या सर्व खेळाडूंचा पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव तथा नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. अभिजीत वंजारी, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक आणि शारिरीक शिक्षक डॉ.चेतन महाडिक यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.