– मनपात करता येणार पात्र व्यक्ती / संस्था यांना अर्ज
– शहर स्वच्छतेत महिलांचा सहभाग होणार अधोरेखित
चंद्रपूर :- महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयातर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत ” महिला आयकॉन अग्रणी स्वच्छता पुरस्कार – २०२३ ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन यात स्वच्छताविषयक विशेष कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे. शासन निर्देशानुसार ०७ मार्च २०२३ ते दि.१५ मार्च २०२३ या कालावधीत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी “स्वच्छोत्सव – २०२३” अभियान राबविण्यात येणार असुन त्याअंतर्गत सदर पुरस्कार दिला जाणार आहे.
८ मार्च अंतरराष्ट्रीय महिला दिनी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला असुन ३ आठवड्याच्या या स्वच्छोत्सव – २०२३ नुसार कचरामुक्त शहरे प्रत्यक्षात आणण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व पार्श्वभूमीतील महिलांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.यात स्वच्छता जागृती फेरी व स्वच्छता शपथ घेणे,जागतिक शून्य कचरा दिन इत्यादी नागरीकांच्या सहकार्याने साजरा केले जाणार आहे.
या स्पर्धेत महिला उद्योजिका,स्वयंसेवी संस्था,स्टार्ट अप्स,स्वयं सहायता समुह,सुक्ष्म उद्योगी इत्यादी पात्र व्यक्ती / संस्था यांना सहभागी होता येणार असुन अर्ज करणाऱ्या पात्र व्यक्ती / संस्था यांनी सामुदायिक / सार्वजनिक शौचालयांचे व्यवस्थापन,सेप्टीक टॅंक स्वच्छता,वापरलेले पाणी / सेप्टीक यावर प्रक्रिया,घनकचरा संकलन आणि वाहतूक,MRF म्हणजेच मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी,वेस्ट टु वेल्थ प्रॉडक्ट्स,घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रणाली,माहीती -शिक्षण -संवाद,प्रशिक्षण,क्षमता विकास,तंत्रज्ञान आणि नाविन्यपुर्ण कार्य या क्षेत्रांमध्ये काम केलेले असावे.
यासाठी पात्र व्यक्ती / संस्था यांना १५ मार्च ते ५ एप्रिल २०२३ दरम्यान चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छता विभागात अर्ज करता येणार आहे. ५ जुन जागतिक पर्यावरण दिनी सदर पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.