नागपूर :- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालय, नागपूर आणि तारकुंडे धरमपेठ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “केंद्र सरकारची नऊ वर्षे” या विषयावर विशेष सेवा सुशासन कार्यक्रमाचे आयोजन आज तारकुंडे धरमपेठ हायस्कूल मध्ये करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष दीपक दुधाणे, मुख्याध्यापिका स्वाती अवधूत , आणि क्षेत्रीय संचार ब्युरो नागपूर कार्यालयाचे उपसंचालक शशिन राय उपस्थित होते.
शालेय समितीचे अध्यक्ष दिपक दुधाणे यांनी मार्गदर्शनपर भाषणात शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. मुख्याध्यापिका स्वाती अवधूत , म्हणाल्या की, आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे पण सकारात्मक बाब म्हणजे तरुणांचा गट जास्त आहे, म्हणजे आपला देश तरुण आहे, जो देश तरुण राहतो तो देश प्रगतीच्या मार्गावर राहतो , अशी आशा त्यांनी व्यक्त केली .
‘मन की बात ‘या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विचार व्यक्त करतात आणि वेळोवेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. विद्यार्थ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना केंद्र शासनाने सुरू केल्या आहेत. असे त्यांनी सांगितले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालयाचे तांत्रिक सहायक संजय तिवारी यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यासोबतच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले.