– भारतीय राज्यशास्त्राची तत्वे आणि त्याची मूल्ये जागतिक स्तरावर पोहचावी यासाठी अधिवेशनाचे आयोजन- विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. लेल्ला कारुण्यकरा यांची माहिती
नागपूर :- भारतीय राज्यशास्त्राची तत्वे आणि त्याची मूल्ये जागतिक स्तरावर पोहचावी यासाठी आखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेचे 60 वे अधिवेशन 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित करणार येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. लेल्ला कारुण्यकरा यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरु प्रो. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांच्या अध्यक्षतेखाली 9 सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी 10 वाजता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या निराला सभागृहात या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून ‘वसुधैव कुटुंबकम: एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा या दोन दिवसीय अधिवेशनाचा मुख्य विषय असेल. यानिमित्ताने भारताचा अमृतकाल आणि मधुकरश्याम चतुर्वेदी स्मृती व्याख्यान सोबतच समांतर ज्ञानसत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी परिषदेचे आयोजन सचिव प्रा. कृष्णकुमार सिंग , सहसचिव डॉ. के. बालराजू, जनसंवाद विभागाचे प्रमुख प्रा. कृपाशंकर चौबे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बुद्धदास मिरगे उपस्थित होते.
या अधिवेशनात देशभरातील विविध विद्यापीठ, महाविद्यालये आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांमधील एक हजाराहून अधिक शिक्षक आणि संशोधक सहभागी होणार आहेत. भारतातील प्रत्येक राज्यांमधून सदस्य सहभागी होणार असून ३० पेक्षा जास्त केंद्रीय आणि राज्य विद्यापीठाचे कुलगुरू आपले विचार या अधिवेशनात मांडतील.
1938 मधे स्थापन झालेली इंडियन पॉलिटिकल सायन्स असोसिएशन ही भारतातील राज्यशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासनातील शिक्षक आणि विद्वानांची सर्वोच्च,जुनी आणि सर्वात मोठी शैक्षणिक आणि राष्ट्रीय नोंदणीकृत व्यावसायिक संस्था असून राज्यशास्त्राची प्रगती करणे, राजकारणाचा शास्त्रीय अभ्यास आणि ज्ञानाचा प्रसार करणे अशी या संस्थेची भूमिका आहे. ‘भारतीय राज्यशास्त्र विज्ञान शोध पत्रिका’ या द्विवार्षिक पुस्तिकेचे प्रकाशन देखील या संस्थेतर्फे करण्यात येते.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ असून महाराष्ट्राची सांस्कृतिक मूल्ये जोपासणे तसेच हिंदी भाषेचा विकास यासाठी विद्यापीठ तत्पर असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. लेल्ला कारुण्यकरा यांनी यावेळी सांगितले आणि या अधिवेशनाला सर्व विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, आणि राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले.