नागपुर :- गोरेवाडा प्रकल्प, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वन्यजीव सप्ताह २०२३ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी चंद्रमा अकादमी, चंद्रपूर येथे पदोन्नत वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासाठी वन्यजीव प्रथमोपचार, हाताळणी, वाहतूक, न्यायवैद्यक शास्त्र याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. सदर कार्यशाळेत ४५ अधिका-यांनी सहभाग नोंदवून भरघोस प्रतिसाद दिला.याबरोबरच काटोल रस्ता व गोरेवाडा प्रकल्पाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये काटोल रस्त्यावर प्रवाशांनी फेकलेला कचरा मोठ्या प्रमाणावर गोळा करण्यात आला.
दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्प, सिल्लारी येथे व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचा-यांसाठी वन्यजीवांच्या अनाथ पिल्लांचे संगोपन, प्रथमोपचार, हाताळणी व वाहतूक याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. तसेच गुन्हा घडल्यास न्यायवैद्यक शास्त्राबाबत माहिती देण्याबाबत.
दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले होते. यात ४० हून अधिक व्यक्तींनी यात सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. दि. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय वन सेवेतून निवृत्त झालेले ज्येष्ठ व अनुभवी वनाधिकारी रविंद्र वानखेडे यांचे सहजीवन व वन्यजीवनाबाबत मनोरंजक व्याख्यान झाले. यात त्यांनी श्रोत्यांना वन्यजीवनाची अतिशय ओघवत्या भाषेत ओळख करून दिली व मानव आणि वन्यजीव यांच्या सहजीवनाचे महत्व विषद केले. हा कार्यक्रम नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय येथील रजत जयंती सभागृह येथे संपन्न झाला.
याच सभागृहात दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रख्यात पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यांचे मनोहारी व्याख्यान झाले. यात त्यांनी असंख्य पक्ष्यांची छायाचित्रांद्वारे तर ओळख करून दिलीच, याशिवाय या पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढून प्रत्यक्ष घनदाट वनांत पक्षीनिरीक्षण करीत असल्याचा जिवंत अनुभव त्यांनी श्रोत्यांना दिला. यानंतर दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी मानद वन्यजीव रक्षक उधमसिंग यादव यांनी गोरेवाडा प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य उपस्थितांना छायाचित्रांद्वारे सापांबाबत माहिती दिली. तसेच सापांबाबत समज-गैरसमज, प्रथमोपचार इ. बाबत सर्वांना अवगत केले.
सर्व कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये डॉ. शिरीष उपाध्ये (संचालक वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र), डॉ. सोमकुंवर (सहयोगी अधिष्ठाता, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय) यांचे उत्तम सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका खोत (सहाय्यक व्यवस्थापक), डॉ. मयूर पावशे, डॉ.सुजित कोलंगथ, डॉ. शालिनी, डॉ. भाग्यश्री भदाने यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी चंद्रसेकरन बाला (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
या सर्वांचे विभागीय व्यवस्थापक म्हणून शतानीक भागवत यांनी आभार मानले.