– 27 ते 29 एप्रिल कालावधीत विविध सत्राचे आयोजन व मुलांसाठी चित्रकला स्पर्धा
नागपूर :- वनामती संस्था व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत राष्ट्रीय बीज महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव नाईक स्मृती सभागृह (वनामती) येथे आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 27 एप्रिलला सकाळी 11 वाजता होणार आहे.
सुरक्षित पोषक अन्न, शाश्वत शेतीचे तंत्र आणि देशी बियाणांच्या जातींचे जतन व प्रसार करण्यासाठी व्यासपीठ तयार केले आहे. अन्न साक्षरता कार्याक्रमांतर्गत बियाणे महोत्सव, सुरक्षित अन्न परिषदा, शेतकरी क्षमता- निर्मिती कार्यक्रम आणि ग्राहक जागरुकता या उपक्रमांची सूरुवात आहे. शेतकरी, स्वयंसेवी संस्था संशोधक, सरकारी तसेच शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय वाढवून येणाऱ्या पिढ्यांसाठी व पर्यावरणाला अनुकूल सुरक्षित पोषक अन्न उपलब्ध करुन देणे यामागचा उद्देश आहे. महोत्सव तीन दिवस राहणार असून सरासरी 15 ते 20 हजार अभ्यागत भेट देणार आहेत.
27 एप्रिलला सकाळी 11 ते 11.45 वाजता बियाणे संवर्धन आणि व्यवस्थापनामधील आव्हाने व संधी या विषयावर कार्यशाळेत संजय पाटील मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 11.45 ते 12.30 वाजेपर्यंत हवामान बदलासह पीक पध्दती बदलणे या विषयावर सुभाष शर्मा मार्गदर्शन करणार आहेत तर दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत कौटुंबिक शेतकऱ्यांना खात्रीशिर उत्पन्न व ग्राहकांना सुरक्षित अनन् याविषयावर रश्मी बक्षी मार्गदर्शन करणार आहेत.
28 एप्रिलला नैसर्गिक संसाधने या विषयावर दादा शिंदे तर दुषित आणि सेंद्रिय मातीचा अभ्यास आणि मानवी आरोग्यावर होणारा त्यांचा परिणाम या विषयावर डॉ. सतीश गोगुलवार व डॉ. मीना शेलगावकर मार्गदर्शन करणार आहेत. जैवविविधतेचे संरक्षण ग्रामसभा व एफआरए द्वारे सहभागी पध्दतीने बाजरीच्या पाककृती आणि त्यामागील विज्ञान या विषयावर अंजली महाजन मार्गदर्शन करणार आहेत.
29 एप्रिलला जैव संसाधन इनपुट केंद्राची स्थापना या विषयावर एनसीएनएफ आणि शेकरुद्वारे तर महिला शेतकरी बीज संवर्धनाच्या कथा या विषयावर सुवर्णा दामले मार्गदर्शन करणार आहेत.
28 एप्रिलला वनामती येथे 8 ते 12 वर्ष व 13 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांसाठी सकाळी 9 वाजता ‘भविष्यातील पर्यावरण संतुलन’ या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आत्मातर्फे करण्यात आले आहे.