उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली

– रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन

– धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन

– धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करत आहेत, हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत, असे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली, रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन या कक्षाच्या उदघाटनासोबतच धर्मादाय रुग्ण योजनेच्या अंमलबजावणीकरीता ऑनलाईन प्रणाली, रुग्णाकरिता 24 तास हेल्पलाईन सुविधा, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील सस्मिता इमारतीत झाले, त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव उदय शुक्ल , धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहाने, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा मोफत व सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय संघटना आणि वैद्यकीय कक्ष समन्वयाने काम करीत आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन या उपक्रमामुळे सुनावणी अधिक सुकर होण्यास मदत होणार असून वेग आणि पारदर्शकता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय मदत कक्षाची अंमलबजावणी

वैद्यकीय मदत कक्ष स्थापनेमुळे धर्मादाय रुग्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल. धर्मादाय रुग्णालयातील राखीव खाटांचे कक्षाकडून वाटप होणार असल्याने सर्व गोरगरीब रुग्णांना खात्रीशीर मोफत, सवलतीच्या दरातील उपचाराकरिता बेड उपलब्ध होणार आहे. गरीब रुग्णांना मोफत तसेच सवलतीच्या दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे सुकर होणार आहे. तसेच रूग्णांना शासनाच्या विविध योजना जसे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, पीएम केअर फंड, मुख्यमंत्री सहायता निधी यांचे वैद्यकीय सहायक कक्षामार्फत मिळवून देण्यात येत आहे. वैद्यकीय साहाय्य करणाऱ्या विविध धर्मादाय संस्थेकडून मदत मिळवून दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ऑनलाईन प्रणालीमुळे योजनेचा लाभ घेण्याकरिता या प्रणाली मार्फत कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी होणार असल्याने खऱ्या गरजू रूग्णांना योजनेचा लाभ मिळणार आहे. धर्मादाय रुग्ण योजनेतील खाटांच्या वितरणात सु-सूत्रीकरण येईल. योजनेचा लाभ घेण्याकरिता या प्रणालीद्वारे जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष यांच्या मार्फत करता येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता निर्माण होणार. धर्मादाय योजनेतील रिक्त खाटांची रिअल टाईम माहिती रुग्णांना उपलब्ध होईल, खऱ्या गरजू रुग्णांना योजनेचा लाभ मिळेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वैद्यकीय मदत कक्षाचे औपचारिक उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनपूर्वीच कक्षाचे कामकाज सुरू झाले असून गेल्या 10 महिन्यात कक्षामार्फत 323 रुग्णांना गंभीर आजारांसाठी मदत करण्यात आली असून मदतीची रक्कम 12 कोटी 73 लक्ष एवढी असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळास भेट दिल्यावर राज्यातील धर्मादाय रुग्णालये, त्यांच्याकडील राखीव बेडची संख्या, यांची माहिती मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईन विषयी माहिती

 नागरीकांना वैद्यकीय आपत्तीच्या काळात धर्मादाय रुग्णालयामध्ये तात्काळ उपचार मिळावेत याकरीता उपमुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत हेल्पलाईन सुरु करण्यात येत आहे.

 ही सुविधा 1800 123 2211 या क्रमांकावर उपलब्ध असणार असून या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णांना योजनेबाबतची माहिती, अर्ज कोठे करावा, इत्यादीबाबत माहिती 24 *7 तास उपलब्ध होणार आहे.

 सदर हेल्पलाईन सुविधा 24 तास सुरु असणार आहे.

राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाची विषयी माहिती

राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाच्या स्थापनेपासूनची माहे जानेवारी, 2024 पासून ते माहे ऑगस्ट 2024 पर्यंत कक्षाच्या माध्यमातून 323 रुग्णांना या योजनेचा लाभ उपलब्ध करुन दिला आहे. त्यानुसार रुपये 12 कोटी 73 लक्ष रकमेचे उपचार रुग्णांना मोफत / सवलतीच्या दरात सहजतेने उपलब्ध झाले आहेत. सदर मदतीमध्ये ह्दय प्रत्यारोपन, कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, यासारख्या गंभीर व सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रीयेंचा समावेश आहे. या व्यतिरीक्त कक्षाने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धर्मादाय ट्रस्ट, शासकीय रुग्णालये, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री केअर फंड, मुख्यमंत्री सहायता निधी यांच्यामध्ये समन्वय साधून 3 ते 4 कोटी रुपयांचे उपचार रुग्णांना उपचार मिळवून दिले आहेत.

राज्यातील हिंगोली जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यामध्ये धर्मादाय रुग्णालयांचे जाळे पसरले आहे. राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे 468 रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे 12000 बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरीता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेन, एन.एन रिलायन्स, बाई जेरबाई वाडीया, डॉ.बालाभाई नानावटी हॉस्पीटल, ब्रीच कॅण्डी हॉस्पीटल, द बॉम्बे हॉस्पीटल, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, डी.वाय.पाटील हॉस्पीटल, के.ई.एम. हॉस्पीटल, सह्याद्री हॉस्पीटल, संचेती हॉस्पीटल, जहांगीर हॉस्पीटल इत्यादी मोठ्या रुग्णालयाचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी शासनाचा मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार

Thu Oct 3 , 2024
– वर्धा जिल्ह्यात होणार मोठी वस्त्रोद्योग गुंतवणुक औद्योगिक विकासाला मिळणार पाठबळ – वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा ) – एमआयडीसी मध्ये 750 कोटी गुंतवणूक, 15 हजार रोजगार उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :- वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com