– पालकमंत्री संजय राठोड यांच्या वतीने दिली जाणार
– ‘मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती’
यवतमाळ :- ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय सेवेत यावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी नाव नोंदणी केलेल्या २ हजार ५२५ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २३४ विद्यार्थ्यांनी रविवारी शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा दिली. दिग्रस, दारव्हा व नेर येथील सहा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली.
१०० गुणांची ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा दिग्रस येथील बा.बू. कला, ना.म. वाणिज्य व बी.पी. विज्ञान महाविद्यालय, दारव्हा येथील मुंगसाजी महाविद्यालय, शिवाजी हायस्कूल आणि एडेड हायस्कूलमध्ये तर नेर येथे दि इंग्लिश हायस्कूल व नेहरू महाविद्यालयात झाली. तिन्ही तालुक्यांमधून २ हजार २५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार २३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दिग्रस येथे ३४२, दारव्हा येथे ४०३ तर नेर येथे ४८९ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. या परीक्षेचा निकाल ३० जून रोजी जाहीर करण्यात येवन शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची नावे घोषित केली जाणार आहे. ५ जुलै रोजी या विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य व विद्यावेतनाचा पहिला हप्ता वितरीत केला जाईल. त्यानंतर अमरावती येथील विदर्भ आयएएस अकॅडमी येथे ८ जुलैपासून १० महिने कालावधीच्या स्पर्धा परीक्षा शिकवणीस सुरुवात होईल. अमरावती येथे निवास, भोजन व अन्य खर्च भागविण्यासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास पालकमंत्री संजय राठोड यांच्यातर्फे प्रतिमाह पाच हजार रुपयांची ‘मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती’ देण्यात येणार आहे.
पालकमंत्री संजय राठोड यांच्यामुळे मनोधैर्य वाढले
आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात राहुन स्पर्धा परीक्षेची तयारी करता येत नाही. ही अडचण जाणून घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघात यापूर्वी अभ्यासिका सुरू केल्या. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी करता यावी यासाठी त्यांच्या वतीने अमरावती येथे १० महिने प्रशिक्षण देण्यात येवून दरमहा पाच हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ना. संजय राठोड यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील अभ्यासू व होतकरू विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढले असून आमच्या मनात प्रशासकीय सेवेत जाण्याची जिद्द निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षेनंतर व्यक्त केली.