अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती मधील वुमेन्स स्टडीज सेंटर अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षेविषयी ‘नेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राला अध्यक्ष म्हणून वुमेन्स स्टडीज सेंटरच्या संचालक डॉ. वैशाली गुडधे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नीता कुकडपवार उपस्थित होत्या.
डॉ. नीता कुकडपवार यांनी आपल्या उद्घघाटकीय मनोगतामध्ये नेट परीक्षेचे बदलते स्वरूप व महत्त्व याबाबत माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. वैशाली गुडधे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा विविध परीक्षांवर होणाऱ्या परिणामावर चर्चा केली. त्याचबरोबर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यशाळा दोन सत्रात झाली. पहिल्या सत्राला विषयतज्ज्ञ म्हणून भारतीय महाविद्यालयाचे ग्रंथपाल वृषभ डहाके उपस्थित होते. त्यांनी नेट परीक्षेच्या पहिल्या पेपर संदर्भात मांडणी केली. सत्र घेताना त्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रांचा वापर करत पहिल्या पेपरचा अभ्यास कसा करावा, त्याकरिता कुठल्या कृती योजना वापराव्यात याबाबत माहिती दिली. दुसऱ्या सत्रासाठी नेट परीक्षेतील वुमेन्स स्टडीज विषयाच्या दुसऱ्या पेपरचे मार्गदर्शन प्रा. पूजा अलोने यांनी केले. या विषयाच्या अभ्यासाची पद्धती, वाचन साहित्याची उपलब्धता, वेळेचे व्यवस्थापन अशा काही बाबींवर मांडणी केली.
कार्यशाळेचे आयोजन व नियोजन विद्यार्थी अभ्यास मंडळाअंतर्गत करण्यात आले होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. सुनिता इंगळे यांनी केले तसेच कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. भगवान फाळके यांनी केले. आभार प्रदर्शन भाग दोनची विद्यार्थिनी सुनंदा बोदिले यांनी केले. कार्यशाळेला विद्यापीठातील विविध विभागाचे विद्यार्थी, संलाग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.