नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा, शासकीय आणि खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरणासंदर्भात बुधवारी (ता.२४) टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभापती सभागृहामध्ये झालेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सरला लाड, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. वसुंधरा भोयर, , डॉ. दीपंकर भिवगडे, डॉ. विजय तिवारी. डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतीक खान, डॉ. मेघा जैतवार, डॉ. प्रिती झरारिया, शासकिय वै्द्यकिय महाविद्यालय व रुग्नालयाचे डॉ. सुभाष ठाकरे, इंदिरा गांधी शासकिय वै्द्यकिय महाविद्यालय व रुग्नालयाचे डॉ. साधना ठाकरे, डॉ. अनुपमा मावळे यांच्यासह झोनल अधिकारी, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक प्रामुख्याने उपस्थित होते.             बैठकीत सर्वप्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ. सरला लाड यांनी बैठकीतील मुद्यांची माहिती दिली. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांनी शहरातील प्रत्येक झोनअंतर्गत असलेली नियमित लसीकरणाची स्थिती मांडली.

डॉ. मोहम्मद साजीद यांनी संपूर्ण शहरात नवजात बालकांचे पहिल्या दिवसांपासून इतर सर्व नियमित लसीकरण हे वेळेवर योग्यरित्या आणि शंभर टक्के व्हावे यादृष्टीने झोनस्तरावर नियोजन आणि कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी झोन वैद्यकीय आरोग्य अधिका-यांना दिले. नियमित लसीकरणासंदर्भात ‘मायक्रो प्लॅनिंग’ करणे, झोननिहाय खासगी डॉक्टरांची बैठक घेणे आदी निर्देशही यावेळी देण्यात आले.

नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत जी बालके वंचित राहिली असतील अशा बालकांचे लसीकरण करण्यात यावे, या दृष्टीने प्रयत्न करण्याचेही निर्देश देण्यात आले. याशिवाय पालकांनीही त्यांच्या बाळांचे लसीकरण झाले नसल्यास त्यांनी आपल्या जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ते करून घ्यावे किंवा आपल्या नियमित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com