– मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पोळी तयार करण्याच्या मशीनचे उद्घाटन
नागपूर :- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) चे संस्थापकाचार्य ए. सी. भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे शिष्य लोकनाथ स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनात रामानुज नगर, कळमना मार्केट, भरतवाडा रोड येथे स्वर्णलता व गोविंद दासजी सराफ (तुमसरवाले) सेंट्रलाइज्ड किचनमध्ये गव्हाची पोळी तयार करण्या-या मशीनचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
सेंट्रलाइज्ड किचनमध्ये प्रवेश करताना अन्नामृत फाउंडेशन नागपूरचे अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर शर्मा आणि डॉ. मधुसूदन सारडा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन डॉ. अभिजीत चौधरी यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा महाराणी यांचे दर्शन घेतले. त्यानंतर अन्नामृत फाऊंडेशन नागपूरचे व्यवस्थापक राजेंद्रन रामन यांनी स्वयंपाकघरातील स्टोरेज व कोल्ड स्टोरेजची माहिती देताना सांगितले की, या स्वयंपाकघरात सर्व मसाले स्वच्छ करून त्यांना बारीक केले जाते, त्यामुळे त्यांचा दर्जा उत्तम राहतो. अन्नामृतचे प्रकल्प संचालक भगीरथ दास आणि प्रवीण साहनी यांनी सांगितले की, येथे डाळी आणि तांदूळ हे वाफेवर शिजवले जात असल्यामुळे त्यांचे पोषण मूल्य अबाधित राहते.डॉ. चौधरी यांनी प्रथम पोळी बनवण्याच्या यंत्रावर स्वस्तिक काढून त्याची पूजा केली. त्यानंतर नारळावर कापूर ठेवून आरती करण्यात आली व नंतर नारळ फोडला गेला. नंतर यंत्राचे बटण दाबून त्याचे औपचारिक उद्घाटन झाल्याची घोषणा करण्यात आली. पोळीचा दर्जा पाहून डॉ. चौधरी यांनी आनंद व्यक्त केला. या रोटी मेकिंग मशिनचे दानदाते पिक्स ट्रान्समिशन लिमिटेडचा सीएसआर प्रमुख शिबू वर्गीस यांचा डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
राजेंद्र रमण म्हणाले की, शालेय पोषण आहाराचा भाग म्हणून आजपर्यंत कोणत्याही शाळेत पोळीचे वाटप केले जात नाही. अन्नामृतद्वारे त्यांच्या आहारात पोळीचा समावेश केला जाणार असून त्यामुळे मुलांच्या जेवणाची चव बदलेल. सध्या महिन्यातून एकदाच पोळी आणि भाजी दिली जाणार आहे. दानदात्यांची संख्या वाढल्यानंतर पोळी वितरणाच्या दिवसांमध्येदेखील वाढ केली जाईल. अन्नामृत दररोज मेडिकल कॉलेज, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद हार्ट हॉस्पिटल, एम्स मिहान आणि सिम्स बजाज नगर येथे रुग्णांच्या नातेवाईकांना गरमागरम वरण, भात, पोळी, भाज्या आणि कधीकधी मिठाईदेखील वितरीत करते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने इस्कॉन नागपूरचे उपाध्यक्ष व्रजेंद्रतनय दास, क्रेडाईचे अध्यक्ष व संदीप ड्वेलर्सचे संचालक गौरव अग्रवाल, डॉ. मधुसूदन सारडा, डॉ. विनोद जैसवाल, शिबू वर्गीस, सी.एस. रामानुज असावा, राजेंद्र चांदोरकर, एलआयसीचे गिरीश मुंजे आणि के. व्ही.सुरेश, एड. आशिष मेहाडिया, सुनील तुलसियानी, रेखा प्रसाद, भिडे शाळेच्या प्राचार्या अर्चना गडीकर, जय गिरधारी दास, विद्वान नित्यानंद दास, हिमांशू प्रभू इत्यादिंचा समावेश होता.
– डॉ. श्यामसुंदर शर्मा,चेअरमनअन्नामृत फाउंडेशन नागपूर