अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत एक दिवसीय विभागीय शिबीरे घेण्यात येणार – जयंत पाटील

– गर्भवती महिलेला मारहाण करणाऱ्या महिलांना तात्काळ अटक करा, पत्रकार आणि रोशनी शिंदे यांना सरकारने तात्काळ संरक्षण द्यावे…

– दबावाचे राजकारण महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही…

– त्या डिग्रीच्याबद्दल प्रश्न निर्माण होत असेल आणि जनतेत त्याची चर्चा होत असेल तर त्याची नक्कीच चिकित्सा होत असते…

– राष्ट्रवादीवर आरोप केल्याशिवाय काही लोकांचा दिवस जात नाही…

– येत्या २४ तासात ठाण्यातील एक तरी पोलीस अधिकारी बदलून राज्यात इतरत्र हलवून दाखवावा,महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांमध्ये दम आहे हे सिद्ध होईल ;गृहमंत्र्यांना जयंत पाटलांचे आव्हान…

मुंबई  :- राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज राष्ट्रवादी भवन येथे झाली. यामध्ये पक्षांतर्गत निवडणूक, पक्ष संघटना, पक्ष बांधणी यावर सविस्तर चर्चा झाली. शिवाय महाराष्ट्रात पक्ष बुथवर बांधण्यासाठी काही विभागीय नेते नेमण्यात आले असून शरद पवार यांच्या उपस्थितीत एक दिवसीय विभागीय शिबीरे घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पक्षांतर्गत तालुका, जिल्हा स्तरावर एक – दीड महिन्यात निवडणूका पूर्ण केल्या जाणार असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

एप्रिल व मे महिन्यात ही शिबीरे घेण्यात येतील. याशिवाय महाविकास आघाडीच्या सभा सुरू आहेत. पहिली सभा संभाजीनगर येथे झाली. पुढची सभा नागपूरला होणार आहे. दरम्यानच्या काळात पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना जबाबदारी देऊन काम करण्याची सुचना करण्यात आली आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्यांदा विभागीय स्तरावरील शिबीरे होतील. आमचे नेते सर्व जिल्ह्यांचा दोन महिन्यात दौरा करतील. हा पक्षाच्या वाढीसाठी कार्यक्रम आहे. त्याप्रमाणे काम केले जाणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

काल परवा एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकाराला धमकावण्यात आले. ही माहिती रोशनी शिंदे यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे शिंदे या महिलेला त्यामुळे मारहाण झाली,ती महिला गर्भवती आहे. महाराष्ट्रात असा हिंसाचार कधी झाला नाही. या सरकारला विरोधात बोलले पटत नाही. रोशनी शिंदे या महिलेला मारहाण झाली याचा अर्थ विरोधात कुणी बोललेले यांना खपत नाही म्हणून त्यांना मारहाण करणे, हल्ला करणे हे गंभीर प्रकरण महाराष्ट्रात झाले आहे. या घटनेचा निषेध करतानाच मारहाण करणाऱ्या महिलांना तात्काळ अटक करा, पत्रकार आणि रोशनी शिंदे यांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे. कसल्या मानसिकतेचे लोक राज्यात सत्तेत बसले आहेत हे यातून लक्षात येते असा संताप जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

वैभव कदम नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. वैभव कदमने आत्महत्या का केली याच्या खोलात जायला हवे. त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून टॉर्चर केले जात होते. जुन्या प्रकरणात दबाव आणला जात होता. दबाव का आणला ? मानसिक छळ का गेला ? कारण जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात बोलल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना अटक करता येईल यासाठी ठाणे पोलीस यामध्ये सहभागी झाले आहेत. या प्रकरणात ठाण्याचे कमिशनर काय करतात. याचा खुलासा झाला पाहिजे. आम्ही कायदयाने चालतो असे समजतो पण कायद्याला मुरड घालण्याचा प्रकार काही लोकांवर दबाव करुन केला जात असेल तर महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही.

दोन गोष्टी आहेत एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीए आहेत म्हणून त्यांना देशाने पंतप्रधान केले असा भाग नाही. त्यांची डिग्री बघून देशाचे पंतप्रधान पद मिळाले आहे तर नाही …पण जर मोदींनी आपली डिग्री अशी आहे असे सांगितले असेल तर मग त्या डिग्रीच्याबद्दल प्रश्न निर्माण होत असेल आणि जनतेत त्याची चर्चा होत असेल तर त्याची नक्कीच चिकित्सा होत असते. त्यामुळे संबंधितांनी त्यावर उत्तर देणे अपेक्षित आहे. मोदीचे पंतप्रधान पद हे त्या डिग्रीमुळे मिळाले असे आम्ही मानत नाही.

संभाजीनगरची दंगल कुणी केली. दंगलीअगोदर स्कुटरवरुन फिरत होते ते कोण आहेत.दंगलीच्यावेळी नेमकी कुणी कुणावर दगडफेक केली याची माहिती पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बघून लवकर पुढे आणावी. त्यावर उत्तर मिळेल जे अनिल बोंडेना अवघड जाईल. त्यामुळे बोंडेंनाच कळेल ही लोकं आपल्या ओळखीची आहेत. हे बोंडेंना अनुभवायला मिळेल. आणि म्हणून सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसत आहेत त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी व कारवाई करावी अशी विनंती जयंत पाटील यांनी केली.

राष्ट्रवादीवर आरोप करण्याचा सपाटा सुरू आहे. राष्ट्रवादीवर आरोप केल्याशिवाय काही लोकांचा दिवस जात नाही. संध्याकाळी झोपण्याअगोदर एकतरी राष्ट्रवादीवर आरोप करावा असे टार्गेट दिले असावे.जळीस्थळी काष्टी त्यांना राष्ट्रवादीच दिसते असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत पण त्यांना ठाणे शहर व जिल्हा त्यांच्या अधिकारात नाही. ठाण्यातील सध्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहिली तर देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करतो की त्यांनी आज किंवा उद्यापर्यंत किंवा २४ तासात ठाण्यातील एक तरी पोलीस अधिकारी बदलून राज्यात इतरत्र हलवून दाखवावा,महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांमध्ये दम आहे . ठाणे शहरातील पोलीस खाते दबावाखाली वागत नाही यावर विश्वास ठेवू. त्यांचे ठाण्यात राज्य आहे हे मान्य करेन असे थेट आव्हान जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

खान्देश, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करुन आलो कुठेही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. सरकार काही मदत करेल असे वाटत नाही. पंचनामे अनेक ठिकाणी झालेले नाहीत. सरकार कधी मदत करेल याची शेतकरी चातकासारखी वाट बघत आहेत. मात्र हे सरकार बिल्डर आणि उद्योगपतींचे आहे ते कधीच शेतकऱ्यांचे, शेतमजूरांचे, कष्टकऱ्यांचे नाही आणि नव्हते असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जास्त महत्व नाही त्यापेक्षा यात्रा काढण्याला हे सरकार महत्त्व देत आहे. जनतेचे प्रश्न सोडवायला हे सरकार कमी पडतेय असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इंदोरा बुद्धविहारातून निघणार ‘डॉ. आंबेडकर धम्म ज्योत’

Tue Apr 4 , 2023
– नागपूरकरांनी मिरवणुकीत सहभागी व्हावे, भदंत ससाई यांचे आवाहन नागपूर :- माणसाला माणूस म्हणून जगता यावे, यासाठी आयुष्यभर लढा देणारे मानवमुक्तीचे प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 13 एप्रिल रोजी इंदोरा येथून ‘डॉ. आंबेडकर धम्म ज्योत’ मिरवणूक निघणार आहे. रात्री आठ वाजताच्या सुमारास निघणार्‍या या भव्य मिरवणुकीत शहरातील आंबेडकरी अनुयायांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!