संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न
अमरावती :- विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांचे हस्ते मागासवर्ग कक्षाचे उपकुलसचिव प्रमोद तालन यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गौरव प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तालन यांचा सहा. कुलसचिव डॉ. स्मिता साठे यांनी साडीचोळी व चांदीचा करंडा देवून सत्कार केला. याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख तसेच सत्कारमूर्ती उभयता उपस्थित होते.
सत्कारमूर्ती तालन मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, मी 1984 साली विद्यापीठात रुजू झालो. आतापर्यंत वित्त, सामान्य प्रशासन, विधी, परीक्षा, भांडार, निवडणूक व मागासवर्ग कक्ष आदी विभागात जबाबदारीने व कर्तव्यनिष्ठेने काम केले आहे. काम करीत असतांना माझ्या सेवाकाळात अनेक चढउतार आलेत, पण कोठेही खचून न जाता विपरीत परिस्थितीवर मी मात केली. विद्यापीठाने मान, सन्मान व सामाजिक प्रतिष्ठा दिली असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे म्हणाले, ज्या कर्मचायांनी विद्यापीठाला 30-35 वर्षे सेवा दिली आहे, त्यांच्याप्रती विद्यापीठाला नेहमीच जिव्हाळा राहीला आहे. तालन यांच्या अनुभवाचा लाभ विद्यापीठाला झाला असून त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे अनुभवाची पोकळी निर्माण झाली आहे. भविष्यातही ते आपली सेवा देतील, अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्यात. तालन यांना भावी आयुष्यासाठी प्र-कुलगुरूंनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्यात.
राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने सुरु झालेल्या कार्यक्रमात कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी व कर्मचारी संघाचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने सचिव प्रवीण पडोळे यांनी सत्कारमूर्तींचा पतसंस्थेतर्फे सत्कार केला. संचालन व आभार जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी मानले. अधिसभागृहात आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळा कार्यक्रमाला विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा.सी.डी. देशमुख, माजी वित्त व लेखा अधिकारी रवि पिंपळगांवकर, बाळासाहेब यादगिरे, दिपक काळे, राजेश पिदडी, तालन यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.