नागपूर :- 28 सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी होते. मार्गदर्शक म्हणून यशदाचे मार्गदर्शक तथा माहिती अधिकार तज्ज्ञ प्रा. विनोद सायरे तर उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड उपस्थित होते.
सामान्य नागरिकांना योग्य ती माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये मिळावी व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
प्रा. विनोद सायरे यांनी माहिती अधिकाराबद्दल विस्तृत माहिती दिली. जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी करावयाची प्रक्रियेवर त्यांनी प्रकाश टाकला माहितीच्या अधिकारामध्ये दोन महत्वाच्या बाबी आहेत. माहिती पुरविणे गोपनीय कारण देता येणार नाही, अपवाद कलम 8 तसेच माहिती विहीत मुदतीत पुरविणे. कार्यालयाचे कामकाजाबाबत अधिनियमांच्या कलम 4 प्रमाणे कार्यवाही करुन प्रवेशद्वाराजवळ माहिती अवलोकनार्थ ठेवावी. त्या माहितीचे सुचना फलक लावावे कलम 5 प्रमाणे कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात सहायक जनमाहिती अधिकारी, जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांचे शाखा कार्यासनाप्रमाणे ठळक अक्षरात माहिती लावावी.
तसेच माहिती अधिकाराचा अर्ज कार्यालयात स्विकारतांना सहायक माहिती अधिकारी नियुक्त करावा, आपल्या कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात ठळक दिसेल अशा दर्शनी भागात नियुक्त जन माहिती अधिकारी नावे फलकावर लावावी, तसेच सर्व माहितीच्या अर्जाचा पत्रव्यवहार व माहिती पुरविणे हे जन माहिती अधिकारी यांनी स्वत: जनमाहिती अधिकारी म्हणून करावयाचे आहे.
आपल्या कार्यालयाची कोणत्याही माहितीच्या अर्जातील माहितीच्या खर्चाकरिता पृष्ठ रुपये 2/- प्रमाणे व पोष्टाचा खर्च सुरूवातीलाच संबंधिताना कळविणे, अतिरिक्त खर्चाचा भरणा करुन माहिती अधिकारी यांचेकडे पावती सादर केल्यानंतरच माहितीच्या छायांकित प्रती काढण्याची प्रक्रिया करावी.
विचारलेली माहिती ही माहिती अधिकाऱ्यांशी संबंधित नसेल तर ती योग्य त्या संबंधित माहिती अधिकाऱ्याकडे किंवा सार्वजनिक प्राधिकरणाकडे 2 दिवसात हंस्तातरीत करावी. तसे अर्जदारास कळवावे, पत्र व्यवहार केल्यास पोस्टाचे पुराव्यासहीत कार्यालयात ठेवावी.
प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी माहिती अधिकार दिनाबाबत माहिती दिली. माहिती अधिकार दिनाचे यावर्षीचे थिम ऑनलाईन माध्यमातून माहिती देणे असे आहे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेस जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.