– ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान : ६७ ठिकाणांची निवड
नागपूर :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत १ ऑक्टोबरला नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात येणार आहे. शहरातील सर्व आमदार, माजी खासदार, माजी नगरसेवक तसेच विविध भागांमधील मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
केंद्रीय गृह निर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने १५ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत १ ऑक्टोबरला सकाळी १० ते ११ या एक तासाच्या कालावधीमध्ये शहरात श्रमदानातून स्वच्छता केली जाणार आहे. यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्व झोनमधील ६७ ठिकाणांची निवड करण्यात आलेली असून शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी या सर्वांनी स्वच्छतेच्या श्रमदानाच्या या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
मोहिमेबद्दल माहिती देताना अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान जाहिर केले आहे. या अभियानांतर्गत २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी त्यांना स्वच्छतेच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार आहे. यासाठी १ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभर एकाचवेळी एक तास श्रमदानातून स्वच्छता केली जाणार आहे. नागपूर शहरातील सर्व झोनमधील ६७ ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता केली जाईल. विविध प्रभागांमध्ये मनपाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह स्वयंसेवी संस्था, परिसरातील नागरिकांद्वारे स्वच्छतेसाठी श्रमदान केले जाईल. प्रत्येक प्रभागातील दोन ठिकाणी मनपातर्फे श्रमदानातून स्वच्छता करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शहरातील सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची आहे. मात्र यासोबतच नागरिकांनी आपले घर, परिसर, कॉलनी या सर्व ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेउन आपली जबाबदारी दर्शविल्यास सहजरित्या शहर स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ राखले जाईल, असा विश्वास व्यक्त करीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होउन आपले घर, परिसर, कॉलनी स्वच्छ करण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
शहरात विविध ६७ ठिकाणी एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात येणार असून यापैकी दीक्षाभूमी, सोनेगाव तलाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कस्तुरचंद पार्क, प्रधान डाक घर (जीपीओ), गांधी मार्केट सक्करदरा, गांधीसागर तलाव, तिरंगा चौक सक्करदरा, मोठा ताजबाग, काशीबाई देवस्थान, महाल, लकडगंज पोलिस स्टेशन आणि परिसर, भारतमाता उद्यान सीए रोड, गंगा बाग भवानी नगर, आंबेडकर उद्यान वैशाली नगर, गुरूतेजबहादूर सिंग गुरूद्वारा महेंद्र नगर कामठी रोड, जरीपटका मार्केट, नागपूर रेल्वे स्टेशन या प्रमुख स्थळी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम पार पडेल.
श्रमदानाचे ठिकाण शोधण्यासाठी विशेष लिंक
नागपूर शहरात एकूण ६७ ठिकाणी स्वच्छता श्रमदान होणार आहे. शहरातील हे सर्व ठिकाण केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा संकेतस्थळावर नोंदविण्यात आलेले आहेत. नागरिकांना आपल्या जवळचे श्रमदान स्थळ शोधावयाचे असल्यास त्यांनी https://swachhatahiseva.com/events या विशेष लिंकवर क्लिक करावे. नागरिकांनी आपल्या जवळच्या स्वच्छता श्रमदान ठिकाणी सहभागी होउन शहर स्वच्छतेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले आहे.