नागपूर :- डेंग्यू आजाराचे रुग्ण जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आढळून येत असून प्रतिबंधाकरिता आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा कोरडा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली डेंगूय आजार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा प्रशासन अधिकारी अतुल पंत, जिल्हा हिवताप अधिकारी डॅा. आदिती त्याडी, हत्तीरोग अधिकारी मोनिका चारमोडे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, जिल्ह्यातील नगर परिषद, पंचायत समिती महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक शनिवारी डेंग्यू आजार नियंत्रणाकरिता एक तास ही संकल्पना जिल्ह्यातील प्रत्येक गावात व शहरात राबविण्यात यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या माध्यमातून डेंग्यू आजाराचे नियंत्रण करता येणे शक्य आहे. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.