आतापर्यंत आम्ही भगवान राम, मर्यादा पुरुषोत्तम राम, अयोध्यापती राम, रणकर्कश राम, जनतेचा राजा राम, रामलला यासारखे नामाभिधान ऐकत आणि वाचत आलो आहोत. शरद पवारांच्या शिल्लक राष्ट्रवादी गटाचे थोर नेते जितेन्द्र आव्हाड यांनी काल बुधवारी यात भर घातली. ओबीसी राम आणि मांसाहारी राम असे म्हणत त्यांनी हिंदू समाजाचा रोष ओढवून घेतला. आव्हाडांचे माजी नेते अजित पवार यांच्या मोठ्या राष्ट्रवादी गटाने त्यांच्या ठाण्यातील घरावर धावून जात सर्वप्रथम आंदोलन केले आणि त्यांना इशारा दिला. समाजाच्या सर्व स्तरातूनही त्यांचा स्वाभाविकच निषेध केला जात आहे.
राम ओबीसी होते, असे सांगून आव्हाडांनी आमच्या ज्ञानात जी भर घातली, त्याबद्दल त्यांचे किती आभार मानावे. राम हिंदू होते, विष्णूचे सातवे अवतार होते एवढेच आम्हाला माहीत होते. त्यांची जात/जात गट सांगून आव्हाडांनी स्वत:ची ‘जातकुळी’ मात्र दाखवून दिली. राम ओबीसी होते, असे सांगत आव्हाडांनी रामाचे हिंदुत्व मान्य केले, हे त्यांचे उपकारच म्हणायचे. अन्यथा, राम हिंदुधर्मीय नव्हतेच, असा जावईशोध लावणे त्यांना अशक्य नव्हते. अशी नवीन कुरापत न काढल्याबद्दलही त्यांचे आभार मानले पाहिजे.
हिंदूंचे देव, संत यांच्या परंपरेच्या संदर्भात आव्हाडांना कितपत माहिती आहे, माहीत नाही. (बहुदा नसावीच. कारण, हिंदूंबद्दल त्यांच्या मनात चांगले भाव नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.) परंतु, आमचे देव आणि संत कधीही जातीच्या नावावर ओळखले जात नसतात. ज्यांचे कर्तृत्व श्रेष्ठ ते देव-संत, हीच आमची परंपरागत भूमिका राहिली आहे आणि हजारो वर्षांपासून ती अबाधित आहे. यातही विशेष म्हणजे, देव आणि संत यांच्यात सवर्णेतरांचे, म्हणजेच बहुजन समाजातील इतर सर्व जाती-पंथांचे प्रमाण फार मोठे, सर्वाधिक आहे.
राम तर इक्ष्वाकु राजघराण्यातील होते, हे जगजाहीर आहे. ते मांसाहारी असू शकतात, नसूही शकतात. हा प्रत्येकाचा खाजगी मुद्दा असल्यामुळे त्यावर वाद, चर्चा होऊ शकत नाही आणि रामाच्या देवत्वाशी तर याचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळेच राम मांसाहारीच होते, हे सिद्ध करण्याचा आव्हाडांची नसती उठाठेव कशासाठी, हा प्रश्न अन् संशय उपस्थित होतो. त्यासाठी आव्हाडांनी केलेला युक्तिवाद चमत्कारिकच नव्हे, तर हास्यास्पदही आहे. काय तर म्हणे, 14 वर्षे वनवासात राहणारा माणूस शाकाहारी राहूच कसा शकतो ? ते जंगलातील प्राणी मारून खात असत. (या शिकारीच्या वेळी बहुदा आव्हाड उपस्थित असायचे🤔 त्याकाळात कॅमेरे किंवा मोबाईल नव्हते म्हणून बरे. अन्यथा, राम शिकार करतानाचे, मांसाहार करीत असल्याचे फोटोच त्यांनी पुरावा म्हणून काल सादर केले असते.) जंगलात राहणारे लोक शाकाहारी नसतातच, हे ज्ञान आव्हाडांना कोणी दिले, याचा शोध घेतला पाहिजे. असा निरर्थक मुद्दा काढून आव्हाडांना काय मिळाले, त्यांचे त्यांनाच माहीत.
परंतु, रामाला ओबीसी ठरवून आव्हाडांनी आपला मोदी-फोबिया मात्र जगजाहीर केला आहे. भाजपासारख्या हिंदुत्ववादी पक्षाने मोदी नावाचा दबंग ओबीसी नेता गेली साडेनऊ वर्षे या लोकांच्या छाताडावर बसविला, हे या लोकांचे खरे दु:ख आहे. ही गोची या सर्वांना पागल करून सोडत आहे. त्यात अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मंदिराची रीतसर भर पडत असल्याने तर हे सारे हतवीर्य झालेले आहेत. अयोध्येचा खटला सुरू असतानाच्या काळात तर आपण रामाचे अस्तित्वच नाकारले होते, बाबरी मशीद पडल्याबद्दल ढसढसा रडलोही होतो अन् आता मोदींनी तोच राम सन्मानाने देशाच्या मध्यवर्ती भूमिकेत प्रस्थापित करून त्याचे सारे श्रेय घेतल्याने आपली पंचाईत झाली, ही या लोकांची खरी पोटदुखी आहे. म्हणून अचानक आव्हाडांचे हे राम-प्रेम. राम आता टाळताच येत नसल्याने ठरवा त्याला ‘आपल्यातला’, त्यासाठी बहुजन समाजाचा बुद्धिभेद करून हिंदू समाजात नवा वाद निर्माण करा या फूटपाडू कारस्थानातून आव्हाड हे ‘ओबीसी कार्ड’ खेळले आहेत. कसेही करून राम मंदिराचा लाभ भाजपाला मिळू नये, यासाठी हा सारा आटापिटा सुरू आहे.
अर्थात् रामाच्या नावाने एकवटलेला हिंदू समाज, अयोध्येच्या राम मंदिराला गालबोट लावण्याचे असे सारे प्रयत्न हाणून पाडणार, हे निश्चित. कारण, राम केवळ ओबीसींचे नाही. समस्त हिंदू समाजाच्या मनात वसलेले दैवत आहे, भारताचे राष्ट्रपुरुष आहेत. (“सारे जहांसे अच्छा…” लिहिणारे कवी महंमद इक्बालच्या शब्दात- राम तो हिंदुस्थानके इमाम है !”) आव्हाडसारख्या छिलट्याने रामाला जातीत गुंतवण्याचा जो अश्लाघ्य आणि जातीयवादी प्रयत्न केला, तो त्यांच्यासारख्यांवर, त्यांच्या आकांवर आणि हिंदुत्व विरोधकांवरच उलटल्याशिवाय राहणार नाही.
– विनोद देशमुख