मनपाचे वर्षभरातील नियोजन आणि उपाययोजनांचे फलीत
नागपूर :- नागपूर शहरामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूची रुग्णसंख्या ही अत्यंत कमी असल्याचे नोंदविण्यात आली आहे. मनपाने वर्षभरात केलेले नियोजन आणि उपाययोजनांचे फलीत म्हणून ही रुग्णसंख्या घटल्याचे दिसून येत आहे. डेंग्यू रुग्णांची घटलेली संख्या ही दिलासादायक बाब असली तरी सतर्कतेच्या दृष्टीने सर्व शहरवासीयांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. डासांची पैदास होउ नये यासाठी घरी, परिसरात स्वच्छता पाळावी. ताप, डोकेदुखी, अंगदुखी अथवा अन्य कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाउन नि:शुल्क चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
नागपूर शहरामध्ये मागील वर्षी १ हजार ५४ डेंग्यू रुग्णांची नोंद होती. यावर्षी या संख्येत मोठी घट झाली असून जानेवारी २०२२ ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान ९८ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. मात्र डेंग्यूपासून होणारा धोका लक्षात घेता प्रतिबंधाच्या दृष्टीने सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. अस्वच्छ ठिकाणातून डासांची पैदास वाढते. त्यामुळे स्वच्छता ठेवावी. डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात वाढतो त्यामुळे घरात परिसरात कुठेही पाणी जमा राहणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी पाणी जमा केले जाते ती ठिकाणे दररोज स्वच्छ करावी, असेही आवाहन मनपा आयुक्तांद्वारे करण्यात आले आहे.
मनपाद्वारे डेंग्यू-मलेरिया सारख्या आजाराला रोखण्यासाठी दहाही झोन निहाय जनजागृती केली जात आहे. वेळोवेळी घरोघरी जाउन सर्वेक्षण केले जात आहे. संबंधित ठिकाणी औषध फवारणी, गप्पी मासे सोडणे यासह धूर फवारणी नियोजित वेळापत्रकानुसार आणि आवश्यकतेनुसार केले जात आहे. तसेच निरीक्षक आणि अधिकाऱ्यांकडून वेळ आणि परिसरानुसार उलटतपासणी करून खातरजमा करण्यात येत आहे. त्यामुळे धूरफवारणी आवश्यक प्रमाणात सुरू आहे. याशिवाय वाढते वायू प्रदूषण लक्षात घेता ते नियंत्रणाकरिता आणि जे वयोवृद्ध, गर्भवती महिला, लहान मुले, दम्याचे रुग्ण यांना त्रास होऊ नये या दृष्टीने यावर्षी शीत फवारणी सुद्धा करण्यात आली आहे. याचा परिणाम स्वरूप नागपुरात डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात दिसून येत आहेत. तरी डासांपासून होणाऱ्या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, नागरिकांना कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास आपल्या जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत चाचणी करून घ्यावी आणि नागपूर महानगरपालिकेस किटकजन्य आजार नियंत्रणा करीता सहकार्य करावे, असे आवाहन ही राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.