गुन्हेगारांच्या शोधासाठी आता स्मार्ट मोटारसायकली !

– राज्य पोलिस महासंचालकांची तत्परता,जीआरपीला मिळाल्या दहा दुचाकी

नागपुर :- लोहमार्ग पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वत:चे वाहन वापरावे लागायचे. शासकीय कामासाठी स्वत:च्या खिशावर पडणारा आर्थिक भुर्दंड पोलिस कर्मचार्‍यांना परवडण्यासारखा नव्हता. ही बाब लक्षात घेत राज्य पोलिस महासंचालकांनी लोहमार्ग पोलिसांसाठी दहा स्मार्ट मोटारसायकली मंजूर केल्या. नव्या कोर्‍या आणि गतीने चालणार्‍या दुचाकी वाहनांमुळे आरोपींचा शोध घेणे सोईचे होईल. शिवाय पोलिस कर्मचार्‍यांच्या खिशावर पडणारा आर्थिक बोजाही कमी होणार आहे. याशिवाय लवकरच आठ चारचाकी वाहनांचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविण्यात येणार आहे.

नागपूर लोहमार्ग परिक्षेत्रांतर्गत नागपूर, इतवारी, गोंदिया, वर्धा, बडनेरा आणि अकोला अशी सहा पोलिस ठाणे येतात. सर्वाधिक गुन्ह्यांचे प्रमाण नागपूर, वर्धा, बडनेरा आणि गोंदिया ठाण्यांतर्गत आहे. पर्स, मोबाईल चोरीचे प्रमाणही वाढतीवर आहे. शिवाय भुरट्या चोरांची संख्यादेखील आहे. तक्रार मिळताच गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिस पथक शासकीय वाहनाने रवाना होते. शासकीय वाहन उपलब्ध नसल्यास स्वत:ची मोटारसायकल, त्यासाठी लागणारा पेट्रोलचा खर्चही स्वत:च करावा लागतो. अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पोलिस कर्मचार्‍यांवर पडू नये यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी दहा मोटारसायकलींचा प्रस्ताव पोलिस महासंचालक (लोहमार्ग) यांच्याकडे पाठविला. त्यांनी राज्य पोलिस महासंचालकांकडे पाठविताच प्रस्तावाला मंजुरी मिळाली. निधीही मंजूर झाला आणि नागपूर मुख्यालयाला दहा स्मार्ट मोटारसायकली मिळाल्या.

गुन्हेगाराला शोधण्यात मदत

गुन्हे शोध पथकाला मोटारसायकली देण्यात आल्या आहेत. शहर किंवा जवळपासच्या गावांत गुन्हेगारांना शोधण्यास मोटारसायकलींची मदत होणार आहे. याशिवाय प्रत्येक ठाण्यात टपाल वाटप करणार्‍या एकाला तसेच अजनी मुख्यालयात दोघांना टपाल वाटपासाठी मोटारसायकली देण्यात येत आहेत. पोलिसांवरील आर्थिक भुर्दंड कमी झाल्याने गुन्हेगारांना शोधण्याची गती वाढणार आहे.

नव्या चारचाकींचा पाठविला प्रस्ताव

मोटारसायकलींचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविला होता. त्यानुसार 10 मोटारसायकली मिळाल्या आहेत. गरजेनुसार प्रत्येक ठाण्याला देण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हेगार तसेच जवळपासच्या गावांत गुन्हेगारांना शोधण्यासाठी यामुळे सोय होणार आहे. याशिवाय आठ चारचाकी वाहनांचा प्रस्ताव पाठविला आहे. वर्षभरात नव्या चारचाकी येतील.

डॉ. अक्षय शिंदे, पोलिस अधीक्षक, लोहमार्ग

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राधा कृष्ण मंदिर में श्रीमद्भागवत कथा 1 मई से

Sun Apr 28 , 2024
– निकलेगी भव्य शोभायात्रा नागपुर :- वर्धमान नगर के श्री राधा कृष्ण मंदिर में 1 मई से 7 मई तक श्रीमद्भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह का आयोजन यजमान नारायण रौनक मनियार परिवार की ओर से किया जा रहा है। कथा का सुंदर सरस वर्णन कथा व्यास डॉ. संजयकृष्ण सलिल महाराज भक्तों को कराएंगे। कथा का समय दोपहर 4 से शाम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com