मुंबई :- केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना 10 फेब्रुवारी 2020 रोजी जारी करून सदर परिक्षेचा अंतिम निकाल 24 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर केला. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्यायविषयक संसदीय स्थायी समितीने उमेदवारांचे वय उलटून जाणे, उमेदवारांच्या शारिरीक व मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होणे, आदी बाबी लक्षात घेवून भरती प्रक्रियेचा कालावधी कमी करण्याची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा सामान्य प्रशासन विभागाला अशा प्रकारची शिफारस प्राप्त झालेली नाही, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
राज्य लोकसेवा आयोगामार्फतच्या पदभरती प्रक्रियेचा कालावधी कमी करण्याबाबत विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
यासंदर्भात पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, केाविडच्या कालावधीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल उशीरा लागला. त्यावेळी आयोगाचे सदस्यही दोनच होते. त्यामुळे आयोगाच्या परीक्षांच्या निकालांना उशीर झाला. याबाबत उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे सूचना करीत म्हणाल्या, की लोकसेवा आयोग संविधानिकदृष्ट्या स्वायत्त संस्था असून परीक्षेचे आयोजन तसेच परीक्षेची कार्यपद्धती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ठरविण्यात येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्यादृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध विषयांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.