एनएनडीटी विद्यापीठाने विद्यार्थिनींमध्ये उद्यमशीलता रुजवावी – राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- आपल्या १०७ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीमध्ये एनएनडीटी महिला विद्यापीठाने स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून राज्याच्या विकासामध्ये अद्भुत योगदान दिले असल्याचे नमूद करुन विद्यापीठाने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विद्यार्थिनींमध्ये उद्यमशीलता रुजवावी असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी येथे केले. मानव संसाधन विकासामुळे चीन देशाने आर्थिक उन्नती साधली असे सांगून महिलांच्या क्षमतांचा उपयोग केल्यास भारत पुनश्च विश्वगुरु बनण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले.

एसएनडीटी महिला विद्यापीठाचा १०८ वा स्थापना दिवस समारोह राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. ७) विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु प्रा. रुबी ओझा, उद्योगपती शेखर बजाज, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, विद्यापीठाच्या प्राधिकारणांचे सदस्य, अध्यापक व आजी-माजी विद्यार्थी होते.

आज महिला स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी सेवा, व्यापार प्रबंधन यांसह अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देत असल्या तरीही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अधिक अनुकुल वातावरण तयार करणे आवश्यक असल्याचे सांगून महिलांना उद्यमशीलतेचे प्रशिक्षण देणे ही त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले. 

उद्यमशीलतेला वित्त पुरवठा करणाऱ्या शासनाच्या मुद्रा, अन्नपूर्णा, स्त्री शक्ती यांसारख्या अनेक योजना कार्यरत असून त्याबाबत विद्यार्थिनींना माहिती देण्यासाठी संस्थागत व्यवस्था निर्माण करावी अशी सूचना राज्यपालांनी विद्यापीठाला केली.

अलीकडेच नंदन निलेकणी यांनी मुंबई आयआयटीला दिलेल्या देणगीचा संदर्भ देताना एसएनडीटी विद्यापीठाने आपल्या प्रगती व विस्तारासाठी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा वापर करावा तसेच माजी विद्यार्थी संघटना निर्मितीसाठी देखील प्रोत्साहन द्यावे असे राज्यपालांनी सांगितले.

विद्यापीठाने आपल्या प्रत्येक विद्यार्थिनीला कार्यानुभव मिळवून देण्यासाठी उद्योगांसोबत सहकार्य प्रस्थापित करुन विद्यार्थिनींच्या प्रशिक्षणाची तसेच आंतरवासीतेची सोय करावी अशीही सूचना राज्यपालांनी केली.

सन २०३५ पर्यंत उच्च शिक्षणात महिलांची टक्केवारी ५० टक्के इतकी वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे नमूद करुन या दृष्टीने विद्यापीठाने कौटुंबिक जबाबदारीमुळे उच्च शिक्षण घेऊ न शकलेल्या महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे राज्यपालांनी सांगितले.

एसएनडीटी विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठ दर्जा अपेक्षित

आपल्या १०७ वर्षांच्या वाटचालीत पाच विद्यार्थिनींपासून सुरुवात करून एसएनडीटी महिला विद्यापीठ आज ५५,००० विद्यार्थिनींना उच्च शिक्षण देत असल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा, याबद्दल प्रस्ताव सादर केला असून लवकरच विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळणे अपेक्षित असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विद्यापीठाचे नव्याने विकसित होत असलेले चंद्रपूर केंद्र सर्वोत्कृष्ट व्हावे या दृष्टीने शासनातर्फे विद्यापीठाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

एसएनडीटी महिला विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देताना विशेष दर्जा देखील द्यावा अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे केली असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरू उज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठाच्या २०२२- २०२७ या कालावधीसाठी तयार केलेल्या विस्तार योजनेची माहिती दिली. विद्यापीठ चार वर्षांच्या स्नातक अभ्यासक्रमासह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यंदापासून लागू करण्याबद्दल सज्ज झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदर्श शिक्षक, उत्कृष्ट महाविद्यालय तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. मणिबेन नानावटी महाविद्यालयाच्या रिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट शिक्षिका म्हणून तर गावदेवी येथील बी एम रुईया महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून सन्मानित करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार-2023 साठी नामांकने

Sat Jul 8 , 2023
नागपूर :- युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, केंद्र शासनाद्वारे दरवर्षी साहसी पुरस्कारांतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी दि.14 जुलै, 2023 पर्यंत नामांकने मागविण्यात आलेली आहेत. तरी इच्छूकांनी https://awards.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा. नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षांमधील असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरीमध्ये साहसी उपक्रम जमीन, हवा किंवा पाणी याठिकाणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com