नागपूर :- मराठीतील प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक ही एक अभिजात कलाकृती आहे. म्हणूनच प्रत्येक पिढीला या नाटकाला हात घालण्याची इच्छा होते. यातील सखाराम बाइंडर, लक्ष्मी, चंपा वगैरे पात्रं अजरामर झाली आहेत. त्यांचा अन्वयार्थ लावण्याचे काम प्रत्येक पिढीतील प्रतिभावान दिग्दर्शक करत असतो. हाच अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न आज आदिती टेकाडे हिने दिग्दर्शनातून केला.
६३ व्या राज्य नाट्य स्पर्धेत लेखक विजय तेंडूलकर लिखित आणि आदिती (निर्मिती) टेकाडे दिग्दर्शित ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक सादर करण्यात आले. रंगभूमी, नागपूर या संस्थेद्वारा हे नाट्य डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सादर करण्यात आले. नाटकांचे रसिक असलेल्यांना या नाटकाचे कथानक सांगण्याची गरज नाही इतकी या नाटकाची चर्चा देशभरात झाली आहे. पण राज्य नाट्य स्पर्धेत नवोदित कलावतांना हे नाटक सादर करावेसे वाटले आणि त्या निमित्ताने एका ज्वलंत विषयाचा विचार करावासा वाटला, हे स्तूत्य आहे.
तेंडुलकरांचे ’सखाराम बाइंडर’ १९७२ साली आले. या नाटकामुळे एकच गदारोळ उठला होता. या नाटकात चंपाचे पात्र रंगभूमीवर साडी बदलते असे एक दृश्य आहे. शिवाय सखाराम बाइंडरच्या तोंडी असलेली भाषा तेव्हाच्या आणि कदाचित आजच्याही उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय संवेदनशीलतेला मानवणारी नव्हती. सखारामचे जगावेगळे जिवन विषयक तत्त्वज्ञानही मराठी संवेदनशीलतेला आव्हान देत होते. अशा कारणांनी सखाराम वादग्रस्त ठरला आणि त्याने इतिहास घडवला. पण सध्याच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ च्या काळात हाच ज्वलंत मुद्दा झाला आहे. समाजात सर्रासपणे असे संबंध आपण बघतो आहोत. त्यामुळे नव्याने या विषयाचा विचार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे नाटक आज स्पर्धेत सादर होेणे महत्वाचे ठरते.
या नाटकात सखारामची भूमिका गजानन जैय यांनी समर्थपणे करण्याचा चांगला प्रयत्न होता. तर लक्ष्मी धनश्री गंधारवार यांनी साकारली. चंपाची भूमिका आदिती टेकाडे, दाऊद – अक्षय चवडे आणि इसम – मुकुल चवडे यांनी साकारला. सर्वच कलावंतांनी घेतलेले परिश्रम नाटकात रसिकांना जाणवत होते. मुळात नाटक हौशी असल्याने फार अपेक्षा नाही पण अधिक अभ्यास कामात येऊ शकतो. दिग्दर्शनात आदितीने परिश्रम घेतल्याचे जाणवले.सुयोग्य प्रकाशयोजना बाबा पद्म यांची तर यथायोग्य संगीत मुकुंद चवडे आणि दिव्यांशु जगताप यांचे होते. सूचक नेपथ्य अभिषेक वैरागडे यांचे तर निर्मिती अदिती टेकाडे यांची होती.