– मनपामध्ये ‘अभिजात मराठी भाषा’ विषयावर व्याख्यान
नागपूर :- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही गौरवाची बाब आहे. मात्र या आधारे आपली वाचन संस्कृती समृद्ध करुन भाषेचा विकास करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचा अभिजातपणा मिरवताना भाषेच्या समृद्धीसाठी व्यापक वैश्विक दृष्टीकोन ठेवून पुढे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेद्वारे १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात आला. मंगळवारी २८ जानेवारी रोजी या कार्यक्रमाच्या समारोपनिमित्ताने मनपा मुख्यालयात डॉ. शैलेंद्र लेंडे यांचे ‘अभिजात मराठी भाषा’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर होते. याप्रसंगी उपायुक्त डॉ. विजया बनकर, सहायक आयुक्त श्याम कापसे, नरेंद्र बावनकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे, संजय दिघारे, नागरी सुविधा केंद्रचे कमलेश झंझाड, जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे आदी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी शाल, पुष्पगुच्छ, मनपाचा मानाचा दुपट्टा आणि सन्मानचिन्ह देऊन डॉ. शैलेंद्र लेंडे यांचा सत्कार केला.
‘अभिजात मराठी भाषा’ विषयावर बोलताना डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी मराठी भाषेला लाभलेली संत परंपरा, नाथ पंथ, दास पंथाची परंपरा यांचा उहापोह केला. त्यांनी भाषेला अभिजातपणा लाभल्यामुळे मराठी भाषेला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाल्याचे प्रतिपादन केले. मराठी भाषा ही महाराष्ट्रातील चवथ्या आणि जगात सातव्या क्रमांकाची भाषा आहे. भाषेमुळे संस्कृतीचे वहन आणि जतन होत असते मराठीच्या अभिजात दर्जामुळे ही परंपरा आता पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भाषांतरातून इंग्रजी भाषा समृद्ध झाली. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करताना इतर भाषा आणि संस्कृती स्वीकारुन त्यातून आपल्या भाषेला समृद्ध करण्याची गरज देखील डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केली.
मुंबई, पुणे, नागपूर या महानगरपालिका मराठी विचारांच्या आधारे आधुनिक झालेल्या आहेत. १९व्या शतकात झालेल्या आधुनिकीकरणामध्ये महानगरपालिकांची परंपरा मोठी राहिलेली आहे. यात भाषीक परंपरेचे योगदान उल्लेखनीय आहे, असेही त्यांनी सांगितले. अभिजातवाद, स्वच्छंदवाद आणि वास्तववाद या तीन घटकांच्या आधारे जीवन समृद्ध होत असते. स्थानिक भाषा, आपली बोलीभाषा रोजगाद देऊ शकत नाही, असा समज समाजात दृढ होत चालला आहे. यासाठी मराठी भाषेला तेवढे समृद्ध आणि विकसीत करुन मराठी ही पुढे रोजगाराची भाषा व्हावी, यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचेही डॉ. लेंडे म्हणाले. १९व्या शतकात अनुवादातून पहिल्यांदा इंग्रजी ज्ञान मराठीमध्ये आणले गेले. त्याआधारे आपले ज्ञानभांडार समृद्ध झाले. अनुवादातूनच आता पुढे भाषेला पुढे न्यावे लागेल त्यासाठी वैश्विक दृष्टीकोन जोपासण्याची आवश्यक आहे. मराठीला घर मानताना त्यातील खिडक्या, झरोके इतर भाषांचे असावेत हा दृष्टीकोन भाषेला समृद्ध करेल, असा विश्वासही डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केला.
अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी आपल्या भाषणात अभिजात मराठी भाषेची संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले व त्यांनी शेवटी आभारही मानले.