देशाच्या आदिवासी पटलावर अत्यंत वेगाने एका तरुणाचे नाव केंद्रस्थानी आलेय. तरुण राजस्थानचा आहे. वय केवळ ३२ आहे. नाव आहे राजकुमार रोत !
मागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना या युवकाने राजकीय चमत्कार केलाय. सध्या तो लोकप्रियतेच्या शिखरावर झळकतोय.
याघडीला राजकुमार रोत हा राजस्थानातील बांसकाठा डुंगरपूर लोकसभा क्षेत्राचा खासदार आहे. त्यांनी आपल्या नजिकच्या प्रतिस्पर्ध्याला अडीच लाख मतांनी पराभूत केलेय. राजकुमारला ८ लाख २१ हजार मते मिळाली.
राजकुमार त्याच लोकसभा क्षेत्रातील चौरासी विधानसभा क्षेत्राचा दोनदा आमदार आहे. २६ व्या वर्षी २०१८ ला तो पहिल्यांदा आमदार झाला. परत दुसऱ्यांदा नोव्हेंबर २०२३ ला तो निवडून आला. आता खासदार !
यावर्षी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत हा जेंव्हा नामांकन भरायला गेला तेंव्हा उपस्थितीचे उच्चांक मोडले. हजारोंची स्वयंस्फूर्त उपस्थिती होती. ज्याचा याने पराभव केला ते आदिवासी समाजातील खूप वजनदार राजकारणी आहेत.
महेंद्रसिंग मालवीय त्यांचे नाव आहे. ते आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री, सी डब्ल्यु सी सदस्य राहीलेले आहेत. आधी ते कांग्रेस मध्ये होते. आता ते भाजपात आहेत. लोकसभा निवडणूक काळात राजस्थानात भाजपचे सरकार होते. आताही आहे.
मालवीय ६४ वर्षाचे आहेत.लोकसभा निवडणुकीच्या १३ दिवस आधी ते भाजपत आले. भारत जोडो यात्रेत ते राहुल गांधी सोबत दिसायचे. एन एस यू आय पासून कांग्रेस मध्ये होते. कांग्रेस चा आदिवासी चेहरा अशी त्यांची ओळख असे. पदाच्या विवादावरुन ते भाजपकडे सरकले. भाजपला मालवीय रुपाने मोठा आदिवासीत राजकीय लाभ वाटला. त्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली.
पण राजकुमारच्या लोकप्रियतेने भाजपचे सर्व पत्ते फिसकटले !
राजकुमारची लोकप्रियता इतकी की विरोधकांनी राजकुमार नावाचे दोन स्वतंत्र उमेदवार उभे केले.त्यातल्या एकाने ७४ हजार व दुसऱ्याने ४१ हजार मते घेतली. याशिवाय बंडखोर कांग्रेसीने ६१ हजार मते घेतली. मालवीय च्या प्रचारासाठी स्वयं प्रधानमंत्री या लोकसभा क्षेत्रात आले होते.
या निवडणुकीत कांग्रेस ने राजकुमारला बिनशर्त पाठिंबा दिला होता.
राजकुमारचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्वसंस्थापित राजकीय पक्ष आहे. ‘भारत आदिवासी पार्टी’ (बाप) हे या पक्षाचे नाव होय. नोव्हेंबर २०२३ ला जेंव्हा राजकुमार दुसऱ्यांदा आमदार झाला त्याच्या दोन महिने आधी त्याने हा पक्ष स्थापन केला.
या निवडणुकीत या पक्षाचे स्वतः राजकुमार व दोन (थावरचंद आणि उमेश मीणा) असे तीन उमेदवार निवडून आले. त्यानंतर काहीच महिन्यात राजकुमार खासदार झाला. म्हणजे आता ‘बाप’ चे ३ आमदार व १ खासदार आहेत.
राजकुमारचे लोकसभेतील भाषण ऐकले. त्याने वर्तमान सरकारवर टीका केली. तो म्हणाला, ‘आमची आदिवासींची स्वतंत्र ओळख आहे. ती कदापिही मिटू नये. मिटविल्या जाऊ नये. आमचा कोणताच धर्म नाही. आम्हाला स्वतंत्र धर्मकोड हवे. आमचा अस्तित्व व स्वाभिमानाचा संघर्ष आहे.
जेव्हा जेव्हा आदिवासी हक्काची बात करतो, जल-जंगल-जमीन चे सांगतो तेव्हा तेव्हा त्याचेवर नक्सलवादाचा ठप्पा लावला जातो’ असेही तो म्हणाला.
सडपातळ, उंच, गौरवर्णीय असलेल्या या पदवीधर तरुणाचे विचार तसे स्पष्ट जाणविले.
राजकुमार वर लिहिण्याचे कारण असे की, भारतीय राजकारणात आदिवसींची स्वतंत्र ओळख गिळंकृत करायला संघ भिडला आहे. आधी वनवासी नंतर हिंदू असा प्रवास सुरू आहे. तो प्रवास भाजपात थांबतो हेही स्पष्ट आहे. दुसरीकडे भारतीय राजकारणात ८ टक्के असलेला हा आदिवासी घटक दुर्लक्षित प्रांत झाल्याची खंत आहे.
अशावेळेस राजकुमार चे उदयास येणे महत्त्वाचे झाले आहे.
– रणजित मेश्राम