चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मध्ये गुरुवार, २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात ८९ मचाणांवरून प्राणी गणना केली जाणार आहे. ‘निसर्ग अनुभव’ या गोंडस नावाने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. एका मचाणवर दोन निसर्गप्रेमींना साडेचार हजार रुपये शुल्क आकारून रात्रभर मुक्कामाची संधी दिली जाते. निसर्ग अनुभवासाठी निसर्गप्रेमींकडून या सर्व मचाणांची नोंदणी पूर्ण झालेली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशाच्या लख्ख प्रकाशात प्राणीगणना केली जाते. यावर्षी प्रथमच ‘कोअर झोन’ वगळता ‘बफर’ क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा परिक्षेत्रातील मचाणांवर प्राणीगणना अर्थात निसर्ग अनुभव हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील ८९ मचाणांवर प्रत्येकी दोन निसर्गप्रेमींना संधी देण्यात आली आहे. आठवडाभरापूर्वीच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने ‘माय ताडोबा’ या संकेतस्थळावर निसर्ग अनुभव उपक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. ८९ मचाणांवर प्रत्येकी दोन, अशा १७८ निसर्गप्रेमींनी यासाठी नोंदणी केली. यासाठी साडेचार हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. तसेच प्रत्येक मचाणवर दोन निसर्गप्रेमींसोबत एक मार्गदर्शक असेल.
दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्ग अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमींमध्ये उत्साह दिसून येतो आहे. या सर्वांना ताडोबा प्रकल्पाच्यावतीने आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सर्व सूचनांचे पालन करावे, असे निर्देश आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या या निसर्ग अनुभव उपक्रमासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील सर्व मचाण दुरुस्ती करून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, ताडोबा बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांच्या नेतृत्वात ताडोबाचे वनाधिकारी हा उपक्रम यशस्वी व्हावा, यासाठी परिश्रम घेत आहेत.
वन्यप्राण्यांची नोंद
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, नीलगाय, अस्वल, कोल्हा, चितळ, सांबर, मोर, लांडोर यासोबतच इतरही वन्यप्राणी आहेत. या सर्व वन्यप्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसोबत असलेल्या मार्गदर्शकाला मचाण प्रगणनेचा तक्ता दिला जाणार आहे. त्यात कोणत्या वेळी कोणते प्राणी दिसले, याची नोंद संबंधित तक्त्यात घ्यायची आहे.