नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

– मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महोत्सवाच्या तयारीचा आढावा

– महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; महोत्सवाचे यशस्वी आयोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित होते. नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शासनाला मिळाली आहे. त्यामुळे नाशिक येथे १२ ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ होणार आहे. त्यामध्ये देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील युवांचे चमू सहभागी होणार आहेत. त्यामुळे महोत्सवाचे आयोजन यशस्वी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या महोत्सवात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यातील प्रत्येकी १०० युवांचा चमू, राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे सुमारे ८ हजार जण यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारीला या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नाशिक येथील तपोवन मैदानावर उद्घाटन समारंभ होणार आहे. महोत्सवांतर्गत सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये समूह लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, छायाचित्र, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने यांचा समावेश असणार आहे.

महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती गठित करण्यात आली आहे. त्याचबरोबर गृह, वित्त, महसूल, कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, सांस्कृतिक कार्य, पर्यटन, शालेय शिक्षण या विविध विभागांचा सहभाग असून त्यांनी समन्वयातून या महोत्सवाचे आयोजन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निवास, भोजन व्यवस्था, कार्यक्रमस्थळ याबाबत आढावा घेतला. त्याचबरोबर महोत्सवासाठी करण्यात आलेले बोधचिन्ह, घोषवाक्य याबाबत क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी सादरीकरण केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभाजनानंतर नवीन स्थापन झालेल्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर

Tue Jan 2 , 2024
मुंबई :- खरीप हंगाम-2023 मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या 1,021 मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेली नाहीत, अशा नवीन महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com