पत्रकार सुमेध वाघमारे, डॉ. धर्मपाल बौध्द, डॉ. अनिल सुर्या, ज्ञानेश्वर रक्षक, माया राठोड, डॉ. वैभव अग्रवाल आणि प्यारे खान यांचा होणार गौरव
नागपूर :- मागील २२ वर्षापासून मानव अधिकार क्षेत्रात कार्यरत राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या वतीने १० डिसेंबरला साजरा होणा-या राष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त ११ डिसेंबर रोजी देशातील विविध भागात मानवाधिकार क्षेत्रात दखलपात्र कामगिरी करणा-या मान्यवरांना राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. रविवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लब येथे हा समारंभ होणार आहे.
समारंभाला मुख्य अतिथी म्हणून माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राउत, विशेष अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती रवी देशपांडे उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ चे संचालक तथा प्राचार्य डॉ. एस.एम. राजन हे भूषवतील.
राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या वतीने मानवाधिकार क्षेत्रात दखलपात्र कामगिरी करणारे ज्येष्ठ पत्रकार दैनिक लोकमतचे उपसंपादक सुमेध वाघमारे, उस्मानिया विद्यापीठ हैदराबादचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. धर्मपाल बौध्द, लेखक, कवी व आंबेडकरी विचारवंत, नवी दिल्ली डॉ. अनिल सुर्या, तत्व चिंतक व समाजसेवक तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटलचे संचालक ज्ञानेश्वर रक्षक, मध्यप्रदेश येथील सामाजिक कार्यकर्त्या माया राठोड, वोकार्ड हास्पीटल नागपूर येथील डॉ. वैभव अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते प्यारे खान यांना राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार संस्था मागील २२ वर्षांपासून मानवाधिकार क्षेत्रात कार्यरत असून संपूर्ण देशात संस्थेचे कार्य सुरू आहेत. संस्थेच्या माध्यमातून अन्यायग्रस्तांना मदत केली जाते व त्यांना नि:शुल्क कायदेशीय सल्ला आणि मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे. अन्याय पीडितांना न्याय न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो व मानवाधिकाराशी संबंधित ज्वलंत मुद्द्यांवर चर्चासत्र जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १० डिसेंबर रोजी दरवर्षी राष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून देशातील विविध भागातील व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यावर्षी रविवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता प्रेस क्लब येथे देशातील विविध भागातील ६ व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी डॉ. अनमोल टेंभुर्णे, अशोक कोल्हटकर, मनिष भाला, दिलीप बाबरिया, प्रदीप त्रिवेदी, शेखर जनबंधु आदींनी केले आहे.