केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस. चंद्रशेखर यांच्या हस्ते 8 एप्रिल रोजी होणार उद्घाटन
नागपूर :- नागपूरच्या वर्धा रोड स्थित विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद-सीएसआयआरच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था – नीरी येथे नीरी या संस्थेतर्फे केल्या जाणाऱ्या संशोधन कार्याची माहिती सर्व हितधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘वन वीक वन लॅब’ (एक आठवडा, एक प्रयोगशाळा) या संपर्क उपक्रमाचे आयोजन 8 ते 13 एप्रिल दरम्यान करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस. चंद्रशेखर यांच्या हस्ते 8 एप्रिल रविवार रोजी सकाळी 10 वाजता नीरीच्या सभागृहात होणार आहे. निरी या संस्थेची स्थापना 8 एप्रिल 1958 रोजी झाली होती याचे औचित्य साधून सामान्य जनता, विद्यार्थी, उद्योग त्याचप्रमाणे ग्रामीण तसेच वनाशी संबंधित ग्रामस्थ या सर्व हितधारकांना निरीच्या मार्फत राबवले जाणारे उपक्रम, संशोधन यांची माहिती होण्यासाठी तसेच या सर्व हितधारकांना पर्यावरण विषयक भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्याकरिता ‘वन वीक वन लॅब’ या संपर्क तसेच संवादात्मक कार्यक्रमाचे 8 एप्रिल ते 13 एप्रिल या सहा दिवसादरम्यान आयोजन करण्यात आले असून यामध्ये महिला सक्षमीकरण, ग्रामीण आणि वनाधारित संस्था, इंडस्ट्री आणि एमएसएमई मीट त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन संस्थांसोबतची बैठक अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निरी संस्थेचे संचालक डॉ. अतुल वैद्य यांनी आज दिली.
याप्रसंगी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एस. चंद्रशेखर नीरीच्या संशोधन आणि विकास उपक्रमांचा आढावा घेणार असून शास्त्रज्ञांना भविष्यातील उपक्रमांबद्दल मार्गदर्शन करतील. विदर्भातील वातावरणातील सूक्ष्म बदलांबाबत तसेच औष्णिक ऊर्जा प्रकल्पांच्या प्रभावांचा अभ्यास करण्यासाठी निर्मित सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटनही ते करणार आहेत .
उद्घाटन सत्रानंतर 8 एप्रिल रोजी महिला सक्षमीकरण,शाश्वत विकासाकरिता हरित विकास या परिसंवादाचे आयोजन सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 दरम्यान करण्यात येईल. 9 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 दरम्यान लोकसंपर्क कार्यक्रमादरम्यान सामान्य जनतेला नीरीचे संधोधन कार्य, प्रयोगशाळा भेटीच्या माध्यमातून बघायला मिळणार असून पथनाट्य आणि नाटक प्रस्तुतीद्वारे नीरीची पर्यावरणाबद्दल भूमिका स्पष्ट देखील होणार आहे.
10 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 दरम्यान ग्रामीण तसेच वनाशी संबंधित ग्रामस्थ यांच्यासोबत चर्चासत्राचे आयोजन होईल. 11 एप्रिलला सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 दरम्यान विद्यार्थी संपर्क कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी-वैज्ञानिक संवाद,व्याख्यान,विज्ञान स्पर्धा यासारखे उपक्रम होतील.
देशाच्या हरित विकास योजनेचा एक भाग म्हणून एमएसएमई क्षेत्र,उद्योग यांच्याशी सहकार्य, आणि विविध पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्याचा हेतूने 12 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 दरम्यान उद्योग आणि एमएसएमई बैठक होणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन या पर्यावरण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान संदर्भात असणाऱ्या मुद्द्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरणीय उपाय शासकीय स्तरावर प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी बैठकीचे आयोजनही 13 एप्रिलला सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 दरम्यान करण्यात येईल .
समाज आणि विविध भागधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी आठवडाभर आयोजित या कार्यक्रमाचा समारोप 13 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता होणार असून यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे.