त्यानंतर लगेच तालुका क्रीडा संकुल, धंतोली, काटोल येथे एका भव्य सभेचे आयोजन.
बँकेचे अध्यक्ष डॉ. आशिष र. देशमुख यांनी जनतेला केले उपस्थित राहण्याचे आवाहन.
काटोल :- विधायक कार्याचे जनक स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवार, दि. ०२ डिसेंबर, २०२२ ला दुपारी ४.०० वाजता अरविंद सहकारी बॅंक लि. मुख्यालय, मेन रोड, काटोल येथे संपन्न होत आहे. हा अनावरण समारंभ सुप्रसिध्द अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यानंतर लगेच तालुका क्रीडा संकुल, धंतोली, काटोल येथे एका भव्य सभेचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती अरविंद सहकारी बँक लि. चे अध्यक्ष डॉ. आशिष र. देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
“रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या नियमांप्रमाणे अरविंद सहकारी बँक लि. ची सेवा १८ मार्च १९९८ ला लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. निरंतर प्रगती करत आज या लोकप्रिय बँकेच्या काटोल, सावनेर, गांधीबाग नागपूर, डिगडोह नागपूर, वरुड, अमरावती अशा ६ शाखा आहेत. ‘लंच ब्रेक’ न घेता सकाळी ९.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत आणि रविवारीसुद्धा ग्राहक सेवा, ही या बँकेची जमेची बाजू आहे. बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बँकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. माझे आजोबा आणि रणजीतबाबू देशमुख यांचे पिताश्री स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्या नावाने सुरु केलेल्या या बँकेने ग्राहकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळविले आहे.
“देशमुख घराणे हे इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढणारे काटोल तालुक्यातील प्रमुख घराणे होते. अरविंदबाबू देशमुख यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा व तत्वज्ञानाचा पगडा होता. दहावी पास होताच सामाजिक जाणीव जोपासून त्यांनी स्वतंत्रता संग्रामात उडी घेतली. ते उपजतच एक समाजनेता होते. राजकीय वारस्याची धुरासुद्धा त्यांनी समर्थपणे सांभाळली. १९४० मध्ये ते सक्रीय राजकारणात सहभागी झाले. त्या काळातील पंचायत राज पद्धतीमध्ये जनपत सभेच्या अध्यक्ष पदावर ते नियुक्त झाले. त्यांनी नागपूर संत्रा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच भू-विकास बँकेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला. त्यांनी सामाजिक, कृषी, शिक्षण, संस्कृती, राजकारण या साऱ्याच क्षेत्रात शिस्तीचे पालन करीत उल्लेखनीय कार्य केले. ते स्वत: एक मोठे शेतकरी होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना विशेष जिव्हाळा व चिंता होती. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, म्हणून त्यांनी वेगळ्याने विचार केला. त्यांच्या कृषीविषयक क्रांतीमुळे शेतकरीवर्ग सुद्धा मोठ्या विश्वासाने त्यांची मदत घेत असे. जनपत सभेचे अध्यक्ष म्हणून ते शेतकरी, गरीब व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी विशेष झटत होते. नागपूर जिल्ह्यात त्यांनी दुधापासून संत्र्यापर्यंत सहकारी संस्था निर्माण केल्या तसेच ग्रामविकास व ग्रामसंस्कृती जपण्यात मोलाचे कार्य केले. ग्रामीण भागातील पुढच्या पिढीने शिकले पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयास केले. प्रचंड जनसंपर्क आणि सामाजिक जाणीव असल्यामुळे अरविंदबाबू जनमानसात लोकप्रिय होते. स्वतंत्रता सेनानी आणि शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांची ओळख आजही लोकांनी जपून ठेवली आहे. त्यांच्या नावाने असलेली अरविंद सहकारी बॅंक लि. ही भविष्यातसुद्धा ग्राहकांना चांगली सेवा देईल. स्व. अरविंदबाबूंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून त्याच्या पावन स्मृती दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आपणांसर्वांना प्रकाशित करत राहतील, असा विश्वास आहे”, असे डॉ. आशिष र. देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकात विषद केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख उपस्थित राहतील.
स्व. अरविंदबाबू देशमुख यांचा पुतळा अनावरण समारंभ तसेच त्यानंतर लगेच नाना पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी मंत्री रणजीबाबू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा संकुल, धंतोली, काटोल येथे होणाऱ्या सभेत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. आशिष र. देशमुख यांनी केले आहे.