विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा : संदीप जोशी यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन
नागपूर : वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे झालेल्या विदर्भ केसरी मुले व मुलींच्या कुस्ती स्पर्धेत नागपूर कुस्तीगीर अॅकेडमीच्या मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्ण पदक पटकाविले. सुवर्ण पदक विजेत्या प्रांजल खोब्रागडे, अंशिता मनोहर व कांस्य पदक विजेती श्रुती सिरसाट या खेळाडूंचे नागपूर कुस्तीगीर अॅकेडमीचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जाेशी यांनी अभिनंदन केले व पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
३१ मार्च ते २ एप्रिल दरम्यान देवळी येथे विदर्भ केसरी मुला/मुलींची कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांच्या कुस्तीपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत नागपूर कुस्तीगीर अॅकेडमीच्या मुलींनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. ४० किलो वजन गटात अॅकेडमीची प्रांजल खोब्रागडे आणि ४८ किलो वजन गटात अंशिता मनोहर या दोघींनी सुवर्ण पदकाची कमाई केली. तर ४४ किलो वजन गटात श्रुती सिरसाट हिने कांस्य पदक प्राप्त केले.
नागपूर कुस्तीगीर अॅकेडमीतील मुलींच्या यशात अॅकेडमीचे प्रशिक्षक गाेवर्धन वरटी, रामा येंगळ, सुनील गाडगीलवार यांनी महत्वाची कामगिरी बजावली. यावेळी नागपूर कुस्तीगीर अॅकेडमीचे गणेश काेहळे, हरीहर भाेवाळकर, सिताराम भाेतमांगे, रमेश खाडे, बुधाजी सुरकर, दयाराम भोतमांगे, प्राचार्य श्री. जाधव, सुधीर मनाेहरे, दिनेश काेवे आदी उपस्थित होते.
विदर्भ केसरी स्पर्धेतील यशाबद्दल नागपूर शहरातील क्रीडा क्षेत्रातून तीनही कुस्तीपटू आणि नागपूर कुस्तीगीर अॅकेडमीचे कौतुक केले जात आहे.