नागपूर, ता. १७ : केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्रालयातर्फे ‘स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज’च्या पुरस्काराची घोषणा सोमवारी (ता. १७ जानेवारी) करण्यात आली. यामध्ये नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला ‘स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज’ अंतर्गत पुरस्कार घोषित झाला आहे. यात देशातील नागपूरसह ११ प्रमुख शहरांचा समावेश आहे. या चॅलेंज अंतर्गत नागपूर स्मार्ट सिटीला ५० लाख रुपयाचा पुरस्कारसुद्धा घोषित करण्यात आला आहे. महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी नागपूर स्मार्ट सिटीच्या चमूचे या पुरस्कारासाठी अभिनंदन केले.
सोमवारी (ता. १७) केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्रालयांचे सचिव श्री. मनोज जोशी यांनी एका ऑनलाईन कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा केली. कार्यक्रमात स्मार्ट सिटी मिशनचे प्रमुख श्री. कुणाल कुमार उपस्थित होते. यावेळी देशातील सर्व स्मार्ट सिटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भूवनेश्वरी एस. सुद्धा सहभागी झालेल्या होत्या.
स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भूवनेश्वरी एस. यांनी सांगितले, केंद्र शासनातर्फे ‘स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज’ उपक्रम १०० स्मार्ट सिटीसाठी राबबविण्यात आला होता. यामधून सुरुवातील ३८ शहरांची निवड करण्यात आली होती. आता नागपूर स्मार्ट सिटीचा समावेश पहिल्या ११ शहरांमध्ये करण्यात आला आहे. नागपूरसाठी हा पुरस्कार अभिमानाची बाब आहे. याअंतर्गत नागपूरला ५० लाख रुपयाचा पुरस्कार सुद्धा घोषित करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी सर्व नागपूरकरांचा, महापौर दयाशंकर तिवारी, स्मार्ट सिटीचे चेयरमन आणि मेंटॉर डॉ. संजय मुखर्जी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, स्टेक होल्डर्स यांचे आभार मानले. पुढे त्या म्हणाल्या, स्टेक होल्डर्स सोबत बैठक घेऊन ‘स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज’ची संकल्पना करण्यात आली. नागपूर स्मार्ट सिटी तर्फे सीताबर्डी आणि सक्करदरा भागाची निवड करण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या बाजारपेठेला शिस्त लावण्याचा तसेच ग्राहकांसाठी सुरक्षित वातावरण राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्मार्ट सिटी तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी मत व्यक्त केले की येथे त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण मार्केटमध्ये तयार करणे गरजेचे आहे.
यापूर्वी सुद्धा नागपूर स्मार्ट सिटीची ‘इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज’अंतर्गत निवड करण्यात आली होती. याअंतर्गत नागपूर स्मार्ट सिटीला नागपूरला एक कोटी रुपयाचा पुरस्कार मिळाला होता. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांनी ऑनलाईन कार्यक्रमात आपले विचार मांडले आणि स्मार्ट सिटीतर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाबद्दल माहिती दिली.
स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभागाच्या प्रभारी व्यवस्थापक व नोडल अधिकारी डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी सांगितले की, नागपूर स्मार्ट सिटीतर्फे नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने शहरात ‘स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज’साठी सीताबर्डी बाजारपेठ आणि सक्करदरा भागाची निवड करण्यात आली होती. नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने या भागांचा सर्वेक्षण करण्यात आला. मार्केट भागात वाहतूक मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे या वाहनांवर प्रतिबंध लावण्याची आवशकता स्थानिक नागरिकांनी बोलून दाखविली होती. तसेच सीताबर्डी बाजारपेठेत युवावर्ग जास्त प्रमाणात येतो त्यानंतर प्रौढ वर्ग येतो. मात्र या मार्केटमध्ये सुरक्षितता वाटत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक यथे येण्यासाठी विचार करतात, असे सर्वेक्षणातून समोर आले.
डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी सांगितले की, या चॅलेंजसाठी सुमित आशिया आर्किटेक्ट, ब्लॅक स्लेट मुंबई, मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्ट आणि अर्बन प्लांनेर हर्षल बोपर्डीकर यांचे सहकार्य मिळाले. तसेच स्मार्ट सिटीच्या सर्व अधिकाऱ्यांनी ‘स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज’साठी मदत केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.