नागपूर-रामटेकमध्ये अटीतटीचा सामना की एकतर्फी ठरणार विजेता ?

नागपूर :- लोकसभा निवडणुकीचे बहुप्रतिक्षित निकाल मंगळवारी जाहीर होणार असून नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदार राजाने नेमका कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. मागील सव्वा महिन्यापासून निकालांबाबत वेगवेगळे कयास लावले जात होते. आता कुणाचे दावे खरे ठरले व कुणाचे आकडे हवेत विरले यावरुन पडदा हटणार आहे. साधारणत: दुपारनंतर कल लक्षात येणार असला तरी निकालाचे अंतिम आकडे हाती यायला वेळ लागणार आहे.

विशेषत: नागपूर मतदारसंघाकडे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर दुसरीकडे कॉंग्रेसचे विकास ठाकरे अशी येथे लढत आहे. तर दुसरीकडे रामटेकमधून शिंदेसेनेचे राजू पारवे व कॉंग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात थेट सामना आहे. वृत्तवाहिन्यांवरील ‘एक्झिट पोल्स’नंतर नागपूर-रामटेकचा गड महायुती राखणार की महाविकासआघाडी अनपेक्षित धक्का देणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.कळमना मार्केट यार्डमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल व साधारणत: दुपारपर्यंत कलाचे चित्र स्पष्ट होईल. निवडणूकांच्या तारखेची घोषणा होण्याअगोदरच नागपुरचे राजकीय वातावरण तापले होते. प्रचारादरम्यान विविध पक्षाच्या नेत्यांनीदेखील नागपुरात उपस्थिती लावून जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. दरम्यान, मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली असून पोलिसांचादेखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पंतप्रधानांपासून या नेत्यांच्या झाल्या सभा

रामटेक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तर नागपुरात कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सभा घेतली. याशिवाय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती, खासदार मनोज तिवारी यांच्या सभांचेदेखील आयोजन करण्यात आले.

कोणता मतदारसंघ फिरवू शकतो निकाल ?

नागपूर पूर्व व नागपूर उत्तर या मतदारसंघात ५५ टक्क्यांच्या वर मतदान झाले. नागपूर उत्तरमधून २०१९ मध्ये नितीन गडकरी पिछाडीवर होते. यावेळी महाविकासआघाडीने तेथे ताकद लावली होती. तर नागपूर पूर्वमधून गडकरींना विक्रमी मताधिक्य होते. यावेळी तेथून मागील वेळपेक्षा जास्त लीड मिळेल असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. नागपुरात हे दोन मतदारसंघ निकालात महत्त्वाचे ठरणार आहेत.

याअगोदरच्या निवडणूकीत असे होते चित्र

२०१४ व २०१९ च्या निवडणूकीत नितीन गडकरी यांनी सलग दोनदा विजय मिळविला. २०१४ मध्ये गडकरी यांनी विलास मुत्तेमवार यांच्यावर २ लाख ८४ हजार ८४८ मतांनी तर २०१९ मध्ये पटोले यांना २ लाख १६ हजार ९ मतांनी पराभूत केले होते. तर रामटेक मतदारसंघात २०१४ मध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी कॉंग्रेसचे मुकुल वासनिक यांना १ लाख ७५ हजार १०१ मतांनी व २०१९ मध्ये कॉंग्रेसचेच किशोर गजभिये यांना १ लाख २६ हजार ७८३ मतांनी हरविले होते.

Source by lokmat
@ File photo

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वामी विवेकानंद मेमोरियल, अंबाझरी रोड जवळ MSEB चे शटडाउनचे काम...

Mon Jun 3 , 2024
नागपूर :- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने (MSEB) स्वामी विवेकानंद मेमोरियल, अंबाझरी रोड जवळ 3 आणि 4 जून 2024 रोजी अत्यावश्यक शटडाउन काम नियोजित केले आहे. 33kV HT केबल दुरुस्त करण्यासाठी आणि सर्किटमध्ये समाकलित करण्यासाठी हे शटडाउन आवश्यक आहे. या कालावधीत, 3 जून 2024 रोजी संध्याकाळी 5-6 वाजेच्या दरम्यान, पंच-1, पैच-2 आणि पंच-3 पाणी प्रक्रिया केंद्रांची (WTPs) वीजपुरवठा लोड तात्पुरता एक्सप्रेस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com