निर्यात, एक जिल्हा एक उत्पादन व व्यवसाय सुलभीकरण परिषद
नागपूर :- नागपूर शहरात निर्यातीमध्ये अग्रेसर होण्याची क्षमता आहे. सद्यस्थितीत तांदूळ, कापूस आणि अभियांत्रिके इत्यादी उत्पादने येथून इतरठिकाणी निर्यात होतात. निर्यातीत जिल्हा अग्रेसर होण्यासाठी विविध उत्पादनांची निर्यात करून हा आवाका वाढविणे आवश्यक आहे. निर्यात प्रोत्साहनासाठी तसेच या उद्योगाला चालणा मिळण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक पायाभूत सुविधा याठिकाणी उभारण्यात येईल, असे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे सांगितले. विदर्भातील उद्योजकांनी तसेच नवउद्योजकांनी निर्यात उद्योग क्षेत्रात जाणीवपूर्वक सहभागी होऊन निर्यात उद्योगाच्या भरभराटीस योगदान द्यावे, यासाठी उद्योग भवन येथे ‘निर्यात, एक जिल्हा एक उत्पादन व व्यवसाय सुलभीकरण’ या दोन दिवसीय परिषदेचे आयोजित करण्यात आले होते. त्या परिषदेचे उद्घाटन बिदरी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. उत्पादन शुल्क विभागाचे सह आयुक्त प्रशांत पाटील, उद्योग विभागाचे सह आयुक्त गजेंद्र भारती, महाव्यवस्थापक मुद्दमवार, जिल्हा कृषी अधिकारी शेंडे, वेद उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष शिवकुमार राव, विदर्भ इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक व्यवस्थापक संतोश राव, हिंगणा एमआयडीसीचे अध्यक्ष कॅप्टन रणधीर यांच्यासह उद्योगक्षेत्रातील व्यक्ती यावेळी उपस्थित होते.
बिदरी म्हणाल्या, नागपूर जिल्ह्यात निर्यात उद्योग वाढीसाठी सर्व प्रकारची क्षमता आहे. नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिहान, एमआयडीसी, औषधनिर्माण कारखाने, प्रक्रिया उद्योगांचे विविध कारखाने अस्तित्वात असून मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. याठिकाणी निर्यातीसाठी लागणाऱ्या आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्यास या उद्योगात भरभराट होऊ शकते. जिल्ह्यात औषध आयुक्तालय कार्यान्वित असून औषधींच्या निर्यातीतील अडथडे दूर सारण्यासाठी नाहरकत दिल्या जाईल. निर्यात उद्योगात नागपूर विभाग तीन टक्क्यांवर आहे. येत्याकाळात निर्यात उद्योग दुप्पट वाढण्यासाठी प्रशासनाव्दारे प्रयत्न केला जाईल.
नागपूर विभागातून वर्ष 2021-22 मध्ये 14 हजार 570 कोटींची निर्यात झाली. जे राज्याच्या एकूण निर्यातीपैकी 2.67 टक्के आहे. यात विभागातून एकट्या नागपूर जिल्ह्याची निर्यातीची 76 टक्केवारी असून उत्पादनांचे पुरक स्त्रोत उपलब्ध असताना इतर जिल्ह्यातून उत्पादने निर्यात होण्याचे योगदान कमी आहे. राज्यातील माल वाहतूकीसाठी असलेली बंदरे आणि नागपूर विभागाचे अंतर सुमारे 900 कि.मी. असल्याने विदर्भातील उद्योजकांना व निर्यातदारांना तार्तिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही, असे भारती यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
विभागात कृषी हब, अभियांत्रिकी हब व वस्त्रोद्योग हब निर्माण करण्यात आले आहेत. परंतु, आंतराष्ट्रीय बाजारपेठेत ओळख निर्माण न झाल्यामुळे तसेच वाहतूकीसाठी नेमकी सुविधा नसल्याने येथील उत्पादीत माल बंदरे येथे पोहोचविण्यास खूप खर्च येतो. आणि त्यामुळे येथील उत्पादनांना आवश्यक बाजारदर मिळत नाही, असे मनोगत शिवकुमार यांनी यावेळी व्यक्त केले.
अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यात उद्योगातील विविध संधी याबाबत जोशी यांनी माहिती दिली. भारतीय निर्यात धोरणाविषयी सनदी लेखापाल वरुण विजयवर्गी, मिहान कॉनकोर यांनी निर्यात करण्यासाठी लागणारे लॉजीस्टीक इन्फ्रास्ट्रक्चर, व्यवसाय सुरलभीकरण संदर्भात कुंभलवार तसेच लघु उद्योजकांसाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या योजनांविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी बजाज स्टील इंडस्ट्रीजचे प्रमुख शर्मा यांनी उत्पादने निर्यात विषयीचे त्यांचे अनुभव सांगितले.
उद्योगभवन येथे सुरु असलेल्या दोन दिवसीय परिषदेत अभियांत्रिकी, फुड प्रोसेसिंग, वस्त्रोद्योग, गारमेंटस, कारागीरांव्दारे निर्मित वस्तूंचे उद्योगव्यवसायाची माहिती दर्शविणारे अठरा स्टॉल्स लावण्यात आले होते. या परिषदेत नागपूर विभागातील विविध उद्योगव्यवसाय क्षेत्रात काम करणो उद्योजक, कारखानदार, तज्ज्ञ व्यक्ती सहभागी झाले होते.