चंद्रपूर :- प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून अंदाजे २०० ते ३०० किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले असुन ९००० रुपये दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईत बाजार परिसरातील व्यवसाय प्रतिष्ठाने, दुकाने यांची कसून तपासणी करण्यात आली. प्लास्टीक व तत्सम साहित्य जप्त करून प्लास्टीकचा दैनंदिन जीवनात वापर न करण्याबाबत सक्त ताकीद याप्रसंगी देण्यात आली तसेच बंदी असलेल्या प्लास्टीक बाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलैपासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन वापर करतांना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
एकल वापर प्लास्टीक बंदी लागू झाल्यानंतर महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा याचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाईल, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा राहणार आहे.
सदर कारवाई केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मनपा यांच्याद्वारे संयुक्तरित्या करण्यात आली.