– अडकेल्या कुटुंबातील चार सदस्यांसह श्वानाला जीवनदान, शहरात विविध भागात बचावकार्य सुरूच
नागपूर :- बुधवारी २६ जुलै रोजी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी जमा झाले तर काही ठिकाणी झाडे पडली. या सर्व ठिकाणी बचावकार्य सुरू असतानाच उमरेड मार्गावरील कळमना येथे एका फार्महाऊसला पाण्याने वेढा दिला. एक परिवार अडकल्याची माहिती अग्निशमन पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अग्निशमन व आणिबाणी सेवा पथकाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार त्वरीत घटनास्थळ गाठून बचावकार्य पूर्ण केले.
उमरेड रोड वरील कळमना येथे हरडे फार्महाऊस येथे विनय धवनगये व त्यांची पत्नी, दोन मुली आणि एक कुत्रा यासह अडकल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली. फार्महाऊस सोबतच सभोवतालचा संपूर्ण परिसर पाण्याने वेढलेला असल्याने पथकाने पाण्यात दूरपर्यंत जाउन फार्महाऊसमधील चार सदस्य आणि श्वानाचे सुरक्षित बचावकार्य केले. मनपाच्या अग्निशमन बचाव पथकाने विनय धवनगये यांच्यासह त्यांच्या पत्नी नलिना (वय ४२), मुलगी पूर्वी (वय ११), निष्ठा (वय ९) आणि एक कुत्रा यांना सुखरूप बाहेर काढले. मनपाचे प्रभारी उपअग्निशनम अधिकारी डी.पी. चव्हाण, आडे, येडवे, ढाकणे, चवरे, कुमरे यांनी बचावकार्य पार पाडले. पथकाच्या कामगिरीबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक करीत शहरात इतर भागातही तत्परतेने बचावकार्य करण्याचे निर्देश दिले.
बुधवारच्या पावसामुळे नागपूर शहरात १९८ ठिकाणी पाणी जमा होणे आणि १५ ठिकाणी झाड पडणे यासह अन्य आपात्कालीन अशा एकूण २२० घटनांच्या तक्रारी मनपाकडे प्राप्त झाल्या. या सर्व परिस्थितीत लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी मनपाचे अग्निशमन व आणिबाणी सेवा पथक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. पथकाद्वारे पाण्यात अडकलेल्या ११ व्यक्तींचे सुरक्षित बचावकार्य करण्यात आले. त्यांच्याद्वारे सातत्याने सुरू असलेल्या कार्याद्वारे नागरिकांना दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मनपा मुख्यालयातील आणि झोनमधील नियंत्रण कक्षांमध्ये माहिती प्राप्त होताच संबंधित पथकाद्वारे घटनास्थळ गाठून आवश्यक बचावकार्य केले जात आहे. नवकन्या नगर येथेही पावसामुळे जमा झालेल्या पाण्यात दोन व्यक्ती अडकल्याची माहिती मिळताच दोन्ही व्यक्तींना पथकाद्वारे सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुभाष नगर येथील संत गजानन महाराज मंदिरासमोर शेवाळकर बिल्डिंग जवळ रस्त्यावर कडुनिंबाचे झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. रात्रीच बचाव पथकाने घटनास्थळ गाठून रस्त्यावर पडलेले झाड कापले व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. पडोळे चौक गोपाल नगर येथील गल्लीमधील रस्ता आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना निर्माण होणारा त्रास लक्षात घेउन तात्काळ अग्निशमन पथकाने मदकार्य सुरू केले व पाणी काढण्याचे काम सुरू ठेवले. ओंकार नगर येथे देखील घरात शिरलेले पाणी काढण्याचे काम बचाव पथकाद्वारे करण्यात आले.
लकडगंज झोन अंतर्गत गरोबा मैदान उद्यानाजवळील एका घरात पाणी शिरल्याचे कळताच लकडगंज अग्निशमन केंद्राच्या पथकाने पम्प लावून घरातील पाणी काढण्याचे कार्य सुरू केले. याशिवाय वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनीतील एका शाळेजवळ पाणी जमा झाल्याची माहिती मिळताच तिथे कॉटन मार्केट अग्निशमन केंद्राद्वारे पाणी काढण्याची कार्यवाही करण्यात आली. सिव्हिल लाईन्स येथील उद्योग भवन जवळ रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीस होणारा अडथळा लक्षात घेउन पथकाने तात्काळ पडलेले झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. सीताबर्डी परिसरात देखील झाड पडल्याची माहिती मिळताच पथकाद्वारे पडलेले झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला. नरेंद्र नगर येथील एकता हाउसिंग को-ऑप. सोसायटीमधील राजेश डोंगरे यांच्या घरामध्ये पाणी शिरल्याची तक्रार प्राप्त झाली. नरेंद्र नगर अग्निशमन केंद्राद्वारे तात्काळ पाणी काढण्याची कार्यवाही करण्यात आली.
न्यु नरसाळा जिल्हा परिषद शाळेच्यामागे क्रिष्णम नगरी बस स्टॉपजवळ हुडकेश्वर येथे नाल्याचे पाणी क्रिष्णम नगरी वस्तीत शिरल्याने त्या ठिकाणी बचावकार्य करण्यात आले. या परिसरात अडकलेले श्रावण भाऊराव सयाम (वय ५०), उषा भाऊराव सयाम (वय ३५), वैष्णवी भाऊराव सयाम (वय १४), श्वेता भाऊराव सयाम (वय १२), राजेन्द्र तकोडीया (वय १९) यांना सुखरुप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. याशिवाय नेताजी नगर प्लॉट नंबर २० येथे घरामध्ये शिरलेले पाणी काढण्याची कार्यवाही करण्यात आली. याच परिसरातील गुलाबराव सरोदे, हरीचांदर मारोडे, अशोक दातीर, राजू झाडे, आशिष भोवते, दिलीप चकोले, जगदीश सेलोकर, राजेंद्र आदमने या सर्व नागरिकांच्या घरामध्ये शिरलेले पाणी काढण्याचे कार्य पथकाद्वारे करण्यात आले.
जाटतरोडी येथे नाल्यामध्ये पडून एकाचा मृत्यू
जातरोडी आंबेडकर पुतळा मूर्ती कारखाना जवळ नाल्यामध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. रविचंद्र गौतम गोंडाने वय अंदाजे ३५ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. सदर व्यक्ती नाल्यात पडल्याची माहिती मिळताच मनपाच्या कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातील उप स्टेशन अधिकारी वाघ, यांच्यासह यंत्र चालक सुधीर जाधव, अग्रेसर बिजवे, कनिष्ठ अग्निशमन अधिकारी बोळे व जगदीश खरे हे घटनास्थळी पोहोचले. बचाव कार्यादरम्यान सदर इसमाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह इमामवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश चाबोरे व धनराज लोहकरे यांच्या स्वाधीन करण्यात आले.