नागपूर : पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचा संदेश देत नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता.३) हरीत शपथ घेतली. ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कर्मचाऱ्यांना शपथ दिली. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकी इमारत परिसरातील शपथ ग्रहण प्रसंगी उपायुक्त निर्भय जैन, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त महेश धामेचा, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षाणी, रक्षमवार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी तसेच मोठया संख्येत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ‘या वसुंधरेवरील पर्यावरणाचे संरक्षण ही माझी आणि प्रत्येकाची जबाबदारी असून त्यासाठी मी कटिबद्ध आहे. या वसुंधरेचे मी रक्षण करेन.’ अशी शपथ घेउन मनपा कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे मागील वर्षभरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले. त्याचेच फलीत म्हणजे मनपाला ‘माझी वसुंधरा अभियान’च्या पाच तत्वावर आधारित स्पर्धेमध्ये शहर अमृत गटात पुरस्कार प्राप्त झाला. शहरातील वायू प्रदूषण कमी करणे, जैविक कचरा निर्मिती, कचरा विलगीकरण आणि कच-याचा पुनर्वापर अशा अनेक पैलूंवर मनपाद्वारे ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत कार्य सुरू आहे.
मनपा कर्मचाऱ्यांनी घेतली हरीत शपथ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com