मनपा राबविणार झोननिहाय “आपदामित्र” संकल्पना

– मान्सूनपूर्व तयारी संदर्भात मनपा आयुक्तांनी घेतला आढावा

नागपूर :- आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने नागपूर शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी आपदामित्र ही संकल्पना राबवण्यात यावी, तसेच लवकरात लवकर जुन्या झालेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांना नोटीस देण्यात यावे, वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणी तात्काळ पाण्याचा निचरा होईल अशा आवश्यक त्यासर्व उपाययोजना आखून त्याची अमलबजावणी करावी, असे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.२२) झालेल्या आढावा बैठकीत दिले.

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थिती विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभा कक्षात झालेल्या बैठकीत मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, डॉ. गजेंद्र महल्ले, नगर रचना उप संचालक प्रमोद गावंडे, मनपा अग्निशमन अधिकारी बी.पी चंदनखेडे, अधीक्षक अभियंता मनोज तलवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक कमांडर कृष्णा सोनटक्के, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवघरे, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, रवींद्र बुंदाडे, श्रीकांत वाईकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, यूएनडीपीच्या शहर समन्वयक आरुषा आनंद, सहाय्यक आयुक्त घनश्याम पंधरे, प्रमोद वानखेडे, महावितरण, कारखाना विभाग, बीएसएनएलचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टी झाल्यास अनेक सखल वस्त्यांमध्ये पाणी साचते. अशावेळी त्वरित प्रतिसाद देण्यासाठी व आपत्तीत प्रशासनाची मदत करण्याकरिता प्रत्येक झोन स्थरावर “आपदामित्र” ची नेमणुक करावी. असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडतात. त्यामुळे पाणी वाहून जावे यासाठी नाल्यांची, चेंबरची सफाई तातडीने पूर्ण करून घ्यावी. जीर्ण झालेल्या इमारतींना धोका असतो. ज्या इमारती धोकादायक आहेत, त्यांची यादी तयार करून त्यांची पाहणी करावी. जी झाडे कोसळू शकतात, अशा झाडांसंदर्भात तातडीने सर्वेक्षण करावे, पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे. लवकरात लवकर जुन्या झालेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, धोक्याचे पूल, रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी असे. निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.

याशिवाय सर्व झोन कार्यालयातील आपत्ती प्रतिसाद साहित्याची सुस्थितीत असल्याचे तपासून घ्यावे. कुठलीही विपरीत परिस्थिती उद्भवलयास 24 तास सेवा देण्यासाठी कंट्रोल रूम मध्ये पुरेशे मनुष्यबळ तैनात करावे, झोन स्तरावरून येणाऱ्या तक्रारींची नोंद करावी, नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढल्यास सतर्कतेचा व धोक्याचा इशारा त्वरित देण्यात यावा, रस्त्यावरील बांधकाम साहित्य तत्काळ उचलून घ्यावे, पावसाळ्यादरम्यान व पावसाळ्यानंतर साथीचे रोग पसरू नये, यादृष्टीने कार्य करण्यासाठी आरोग्य विभागाने तत्पर राहावे, असे निर्देश दिले.

प्रत्येक झोन सहायक आयुक्तांनी पावसाळयात होऊ शकणारा संभाव्य धोका लक्षात घेता मशिनरी, यंत्रसामुग्री तयार ठेवावी. आपत्ती व्यवस्थापन चमूमध्ये असणाऱ्या सर्वांचे क्रमांक जाहीर करावे. प्रत्येक विभागाने आपसात समन्वय ठेवून आपत्ती व्यवस्थापनाचे उत्तम कार्य करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. आपात परिस्थितीसाठी सर्व विभागाने समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गणेश टेकडी मंदिरांत महिला सेविकांना साड्या व ओटीचे सामान देऊन सन्मान

Thu May 23 , 2024
नागपूर :- गणेश टेकडी मंदिरात आज दिनांक 22 मे रोजी महिला सेविकांनसाठी खूप भाग्याची व आनंदाची बाब आहे की गणेश टेकडी मंदिरात सर्व महिला सेविकांना महालक्ष्मी प्रसादाच्या रूपात साड्या व इतर वस्तू व फळे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव श्रीराम बापूराव कुलकर्णी, सहसचिव अरुण गोविंदराव व्यास आणि कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com