पाचपावलीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ च्या शिबिराचे उदघाटन
नागपूर :- शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे तसेच प्रत्येकाला आरोग्य सेवेचा यथोचित लाभ मिळावा याकरिता नागपूर महानगरपालिका आरोग्य यंत्रणा पूर्णतः कटिबद्ध असल्याचे सांगत, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष मोफत आरोग्य शिबिराचा लाभ महिलांनी अधिकाधिक प्रमाणात घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी नवरात्री कालावधीत २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविल्या जात आहे. अभियानांतर्गत मनपाच्या दहाही झोननिहाय विशेष मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येत आहेत. यानिमित्त पाचपावली सूतिकागृह येथे मंगळवारी (ता. २७) आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहा.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, उत्तर नागपूरचे माजी आमदार डॉ. मिलिंद माने, MCI चे उपाध्यक्ष डॉ. विंकी रुघवाणी, जयप्रकाश पारेख, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपांकर भिवगडे, इंचार्ज वैद्यकीय अधिकारी डॉ.संगिता खंडाईत, डॉ. गिरीश चरडे, HSG हॉस्पीटलचे डॉ. कमलजीत कौर व त्यांची चमु, शासकीय दंत महाविद्यालयाचे डॉ. अनिकेत व त्यांची चमु, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम, आरोग्य व एनयुएचएम समन्वयक दिपाली नागरे यांच्यासह आरोग्य विभाग कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. म्हणाले, शहरातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा तत्परेने कार्य करीत आहे. आरोग्याच्या दृष्टीने कुटुंबातील स्त्री सुदृढ असेल तर ती संपूर्ण कुटुंबाला निरोगी ठेऊ शकते. याकरिता महिलांनी आपले आरोग्य जपायला हवे. आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. महिलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी नवरात्री कालावधीत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे अभियान राबविण्यात आहे. महिलांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा यासाठी शहरातील विविध भागात मोफत आरोग्य शिबीर घेण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये स्त्रियांची सर्वांगीण आरोग्य तपासणी केल्या जाणार असून, कॅन्सर स्क्रिनींग देखील केल्या जाणार आहे. याशिवाय समुपदेशनही केले जाणार आहे. शहरातील महिलांनी अधिकाधिक आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहनही मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले.
समुपदेशनासह पोषण संदर्भात योग्य मार्गदर्शनाची व्यवस्था
अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की , “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानांतर्गत घेण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये विविध विषयांवर समुपदेशन केल्या जात आहे. तसेच तज्ञांमार्फत कुटुंब नियोजन, पोषण, स्तनपान, अति जोखमीच्या प्रसुतीकरीता योग्य मार्गदर्शन व समुपदेशन आणि तपासणी या शिबिरामध्ये केल्या जात आहे. याशिवाय महिला व बालकांच्या आरोग्याशी निगडित पोषण आहारासंदर्भात माहिती फलक देखील शिबिरामध्ये दर्शविण्यात आले आहे. सोबतच गरोदर आणि प्रसूत व स्तनदा मातांसाठी रुचकर पण पौष्टिक अशा आहाराची प्रदर्शनी देखील शिबिरामध्ये लावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा प्रत्येक मातेला लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगत महिलांनी शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहनही अति.आयुक्त राम जोशी यांनी केले.
आयुक्तांनी साधला महिलांशी संवाद
आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी महिलांशी स्वतः संवाद साधून त्यांच्या समस्या आणि आरोग्यविषयी असलेले प्रश्न जाणून घेतले. यानंतर त्यांनी गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी लावलेल्या पोषण आहार स्टॉलला भेट देत, स्टॉलवर ठेवण्यात आलेल्या पोषण आहाराबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. गर्भवती महिलांसाठी असलेला पोषणपूर्ण आहार आणि स्तनदा मांताना दिला जाणारा आहार याबाबत येथे उपस्थित आरोग्य सेविकांनी त्यांना माहिती दिली.