शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात मॉडेल स्कूल योजना राबविणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती

नागपूर : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात मॉडेल स्कूल योजना राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबत सदस्य जयंत आसगावकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर बोलत होते.

मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, राज्यातील शाळामधील गुणवत्ता वाढण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात मॉडेल स्कूल करणार आहे. सेंट्रल बोर्ड यापद्धतीने ही मॉडेल स्कूल असतील. सद्यस्थितीत 50 टक्के शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे केली जाणार असून सर्व परीक्षांचा निकाल मार्चमध्ये लागल्यानंतर आणि आधार लिंकिंग पूर्ण झाल्यानंतर 80 टक्के भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

पवित्र पोर्टलमध्ये कला आणि क्रीडा शिक्षक नाहीत, संच मान्यता झाल्यानंतर त्यांचा समावेश पोर्टलवर करू. संच मान्यता ही विद्यार्थी संख्येवर असून आधार लिंक केल्याने विद्यार्थी संख्या समजेल.15 ते 20 वर्षे अनेक शाळांचे रोस्टर नव्हते. रोस्टर करून टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उर्वरित अनुदान देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असेही मंत्री केसरकर यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे, नागो गाणार यांनी सहभाग घेतला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com