नागपूर :- विकासपथावर अग्रेसर असणाऱ्या नागपूर महानगरपालिकेला शहरातील सुरक्षा आणि गतिशीलतेसाठी जिओस्मार्ट इंडिया एक्सलन्स पुरस्कार प्राप्त झाला आहे.
जिओस्पॅटेटिअल वर्ल्ड अॅडव्हान्सिंग नॉलेज फॉर सस्टेनेबिलिटीच्या वतीने एचआयसीसी हैदराबाद येथे आयोजित जिओस्मार्ट इंडिया 2022 पुरस्कार वितरण सोहळ्यात नागपूर महानगरपालिकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSCDCL)चे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी मनपातर्फे हा पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी मनपा वाहतुक विभागाचे कार्यकारी अभियंता रवी बुंधाडे, जिओस्पेशिअल वर्ल्डचे अध्यक्ष डॉ. एम. पी. नारायणन, जिओस्पेशिअल वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेने iRASTE (तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीद्वारे रस्ता सुरक्षिततेसाठी इंटेलिजेंट सोल्युशन्स) हा प्रकल्प शहरात सुरू केला आहे. याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Al)सहाय्याने नागपूर शहरातील रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या 50 टक्केने कमी करण्याचा ध्येय मनपाचे आहे. अशाप्रकारेचे हे देशातील पहिलेच प्रकल्प आहे. iRASTE मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शास्त्रज्ञ आणि रस्ता अभियांत्रिकी तज्ञांना एकत्र आणले आहे. शहरात होणाऱ्या अपघाताचे ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट्स’ ओळखून त्यांना “ग्रे स्पॉट्स मॅप सिस्टीम” मध्ये सादर करून अपघात कमी करण्यास iRASTEची मदत होत आहे. मनपाच्या परिवहन विभागाव्दारे वाहन चालकांना तसेच कंडक्टरांना विशेष प्रशिक्षण iRASTE च्या माध्यमाने दिले जात आहे. त्यांना वाहतुक नियमांचे पालन करणे, मद्यपान करुन वाहन नाही चालविणे, प्रवाश्यांसोबत योग्य वागणुकी देणे इत्यादीबद्दल माहिती देण्यात आली. सूचनांचे पालन करणा-या चालकांना प्रत्येक महिन्यात पुरस्कार दिला जातो.