– 4 लक्ष रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर
चंद्रपूर :- आयुक्त विपीन पालीवाल यांनी चंद्रपूर शहरात मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी सुरु केलेल्या नॅच प्रणालीची दखल राज्य शासनाने घेतली असुन 2024-25 च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेला तृतीय क्रमांक व 4 लक्ष रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.
प्रशासनाच्या कार्यात गतिमानता आणण्यास नवनवीन बदल करणे आवश्यक ठरते आणि ते करण्यास नवीन तंत्रज्ञानाची मदत होते.आयुक्त विपीन पालीवाल यांनी मनपाच्या कर विभागासाठी मालमत्ता कराची नॅच प्रणाली सन 2023-24 मध्ये यशस्वीरित्या राबविली. यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता आली.नागरीकांना कराचा भरणा करण्यास प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहिली नाही तसेच दर महिना,तीन महिन्यांनी,सहा महिन्यांनी व पूर्ण वर्षाचा मालमत्ता कर भरण्याची सुविधा प्राप्त झाली.
या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान 2023-24 स्पर्धेत चंद्रपूर मनपाला तृतीय पारितोषिक जाहिर झाले आहे. महानगरपालिका स्तरावरून थेट प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे. प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 यां दोन वर्षांत राज्यस्तरावर तसेच तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान राबविण्यात आले.
या स्पर्धेत सहभागी सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांचे विविध निकषांवर परीक्षक मंडळाकडून परीक्षण करून निकाल तयार करण्यात आला व बुधवारी शासन निर्णयाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता अमलात असल्याने 2023-24 चे पुरस्कार जाहीर करण्यात आले नव्हते.