नागपूर : नागपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ बनवून स्वच्छ सर्वेक्षण २०२३मध्ये दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे वाटचाल सुरू झालेली आहे. स्वच्छतेचे कार्य हे कुठलेही विभाग अथवा अधिकारी यांच्यापूरते मर्यादित नसून ते सर्व विभाग आणि अधिकारी, कर्मचा-यांच्या समन्वयाने आणखी उंचावणारे आहे. सर्वांच्या समन्वयाने नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यात वेळ लागणार नाही. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात दर्जा उंचावण्यासाठी समन्वयाने कार्य करा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.नागपूर महानगरपालिकेच्या वतीने केजीएमपीच्या सहकार्याने शुक्रवारी (ता.२०) स्वच्छ सर्वेक्षण २०२३च्या अंतर्गत महाल येथील मनपाच्या नगर भवनात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेत अधिकारी व कर्मचा-यांची क्षमता बांधणी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी स्वच्छ सर्वेक्षणच्या विविध पैलूंचे बारकावे मांडले. यावेळी स्मार्ट सिटीचे सीईओ अजय गुल्हाणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, केपीएमजीचे महाराष्ट्रातील प्रमुख स्वप्नील देशमुख, अंकूश धिंगरा आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी शहर स्वच्छतेची शपथ घेतली.मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ सर्वेक्षणातील अनेक बारकावे मांडले. त्यांनी स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत प्राधान्याने कार्य करण्याच्या बाबी, दैनंदिन कार्यात करावयाच्या सुधारणा आदींबाबत उदाहरणांसह सविस्तर विवेचन केले. मनपातील विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचा-यांना प्रोत्साहन देउन त्यांना पुढील कार्यासाठी आयुक्तांनी शुभेच्छा देखील दिल्या. कार्यशाळेत प्रास्ताविकात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी स्वच्छ सर्वेक्षणातील मनपाची आधी स्थिती आणि चुकांचे विवेचन करून त्यावरील पुढील कार्यवाही मांडली. अधिकारी, कर्मचा-यांच्या क्षमता बांधणीसोबत सर्वसामान्य नागरिकांच्या वर्तवणुकीतील बदलांसंदर्भातही करावयाच्या कार्याचा उहापोह जोशी यांनी यावेळी केला.‘झिरो वेस्ट’ कार्यशाळा
स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे महत्वाचे उचलले जात आहे. शुक्रवारी घेण्यात आलेली कार्यशाळा पूर्णत: ‘झिरो वेस्ट’ अर्थात कचरा विरहित कार्यशाळा ठरली. कार्यशाळेदरम्यान कुठल्याही प्रकारचा कचरा निर्माण होउ देण्यात आलेला नाही. तसेच कचरा निर्माण होउ शकणा-या बाबी टाळण्यात आल्या. उपस्थितांना चहापानासाठी काचेच ग्लास आणि कप वापरण्यात आले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्याची औपचारिकता टाळून थेट कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. मनपाद्वारे यापूर्वीही कचरा विरहित कार्यक्रमासाठी पुढाकार घेण्यात आलेला होता. वॉल पेंटिंग स्पर्धेच्या विजेत्यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रम सुद्धा कचरा विरहित कार्यक्रम ठरला होता.