– पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीच्या दृष्टीने मनपा सज्ज
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे असलेल्या महत्वाच्या उपकरणांची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज शुक्रवार ५ जुलै रोजी पाहणी केली. मनपाच्या विविध अग्निशमन केंद्रांमध्ये तैनात उपकरणांचे कळमना अग्निशमन प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रदर्शन लावण्यात आले होते.
या उपकरणांच्या निरीक्षणाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, कार्यकारी अभियंता संजय माटे, केंद्र अधिकारी तुषार बाराहाते आदी उपस्थित होते.
अग्निशमन विभागाचे अनिल बालपांडे यांनी विविध केंद्रांमधील अग्निशमन उपकरणांची माहिती आयुक्तांपुढे सादर केली. आगीच्या ठिकाणी मोठे वाहन पोहोचण्यापूर्वी सेवा देण्यासाठी कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रात तैनात ‘व्हीआयपी मोव्हमेंट आरआयव्ही व्हेहिकल’, लकडगंज अग्निशमन केंद्रातील ‘मड पम्प’, कळमना अग्निशमन केंद्रातील ‘पोर्टेबल डिवॉटरिंग पम्प’, सिव्हिल लाईन्स अग्निशमन केंद्रातील ‘इमर्जन्सी पोर्टेबल लाइटिंग सिस्टीम’, ‘सेल्फ कंटेन्ड ब्रीदिंग अपार्टस’, ‘पनुमेटिक लिफ्टिंग बॅग’, सक्करदरा अग्निशमन केंद्रातील इन्फेटेबल पोर्टेबल लायटिंग सिस्टीम’, नरेंद्रनगर आणि लकडगंज अग्निशमन केंद्रातील ‘स्प्रेडर कटर’, ‘पॉवर पॅक्ड स्प्रेडर’, ‘स्प्रेडर /कटर’, सुगत नगर अग्निशमन केंद्रातील ‘इन्फ्लेटेबल रेस्क्यू बोट’, कळमना अग्निशमन केंद्रातील ‘फोम अँड फोम एक्यूपमेन्ट’, ‘ब्रॅंचेस अँड हेड्स’, ‘फायर सूट’, ‘लाईफ बॉथ’, ‘लाईफ जॅकेट’, ‘स्मॉल गियर’, ‘चेनसॉ’, ‘काँक्रीट अँड मेटल सर्क्युलर कटर’ या सर्व उपकरणांची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली.
अग्निशमन विभागाच्या यंत्रणेच्या संपूर्ण कामावर मनपा आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. शहरातील सुविधेनुसार विभागाला आवश्यक असलेल्या उपकरणांच्या उपलब्धतेसाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला व उपकरणांची यादी विभागाकडून मागविली. वायरलेस प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याबाबत आवश्यक कार्यवाहीचे देखील त्यांनी निर्देश दिले. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य कार्य करताना अग्निशमन जवानांनी सुरक्षेची काळजी घेण्याबाबत आयुक्तांनी सूचना केली. कळमना अग्निशमन केंद्रामध्ये जुने ‘व्हिंटेज’ अग्निशमन वाहन आहे. हे वाहन शहरातील प्रमुख चौकात ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
याप्रसंगी अग्निशमन विभागाचे सतीश रहाटे, उप. अ. अधिकारी अजय लोखंडे, कळमना अग्निशमन केंद्राचे अकलीम शेख, कॉटन मार्केट केंद्राचे भगवान वाघ, सिव्हिल लाईन्स केंद्राचे रुपेश मानके, सक्करदरा केंद्राचे शिवाजी शिर्के, लकडगंज केंद्राचे दिलीप चव्हाण, राजेंद्र शिंदे, नरेंद्र नगर केंद्राचे अशोक घवघवे, सुगत नगर केंद्राचे रवींद्र त्रिवेदी आदी उपस्थित होते.
‘आपदा मित्र’ ची प्रक्रिया पूर्ण करा
केंद्र शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशानुसार शहरात ‘आपदा मित्र’ ची नियुक्ती करण्याचे प्रस्तावित आहे. शहरातील दहाही झोनमध्ये प्रत्येकी १५ याप्रमाणे एकूण १५० ‘आपदा मित्र’ची निवड केली जाणार आहे. यासंदर्भात आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद
मनपा आयुक्तांनी कळमना अग्निशमन प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची पाहणी केली. प्रशिक्षणार्थींना देण्यात येत असलेल्या सुविधांचा आढावा घेतला. डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. त्यांना परीक्षेबद्दल विचारणा केली व शुभेच्छा दिल्या.