मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी केली बस्तरवारी परिसरातील ट्रान्सफर स्टेशनची पाहणी

नागपूर :- बस्तरवारी ट्रान्सफर स्टेशनमुळे नागरिकांना होत असलेला त्रास आणि त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी या अनुषंगाने तातडीने पर्यायी जागा शोधून त्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. पर्यायी जागेची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सध्याच्या ट्रान्सफर स्टेशनमधून दुर्गंधी येणार नाही व नेहमी स्वच्छता रहावी याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

गुरूवारी (ता.२४) सतरंजीपुरा झोनमधील बस्तरवारी येथील कचरा ट्रान्सफर स्टेशनची मनपा आयुक्तांनी पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता अश्विनी येलचटवार, उपअभियंता नीलेश बोबडे, झोनल स्वच्छता अधिकारी राजीव राजुरकर आदी उपस्थित होते.

बस्तरवारी ट्रान्सफर स्टेशनवर कॉम्पॅक्टर लावण्यासाठी आवश्यक सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी या संपूर्ण कामाची पाहणी केली. सदर जागेमध्ये चार कॉम्पॅक्टर लावण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक कार्य पूर्ण करण्याबाबत देखील आयुक्तांनी निर्देश दिले. कॉम्पॅक्टर मधून निघणारा कचऱ्यातील घाण पाणी परिसरात जमा राहू नये यासाठी ते पाणी थेट सिवर लाईनमध्ये जावे याबाबत कटाक्षाने काळजी घेणे तसेच रॅम्प तयार करणे, नालीवर जाळी लावणे आणि लोखंडी पट्ट्या बसविण्याचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत देखील त्यांनी सूचना केली.

यावेळी परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्याशी संवाद साधून आपल्या समस्या मांडल्या. मनपाच्या बस्तरवारी शाळेजवळ नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्यामुळे घाण वास येत होती. ती जागा पूर्णपणे साफ करून सौंदर्यीकरण करण्यात आल्याबद्दल त्यांनी मनपाचे आभार मानले. यासोबतच बस्तरवारी ट्रान्सफर स्टेशनवर स्वच्छता होत नसल्याचे सांगत त्यांनी त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार केली. सदर ट्रान्सफर स्टेशन इतरत्र हलविण्याबाबत देखील मागणी केली. नागरिकांच्या मागणीवर उत्तर देताना आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी बस्तरवारी ट्रान्सफर स्टेशन हे तात्पुरत्या स्वरूपामध्येच लावण्यात आल्याचा विश्वास दर्शविला.

मनपाद्वारे पर्यायी जागेचा शोध घेण्यात येत असून लवकरच हे ट्रान्सफर स्टेशन पर्यायी जागेत हलवून नागरिकांना दिलासा मिळवून दिला जाईल, असाही विश्वास व्यक्त केला. यासोबतच त्यांनी बीव्हीजी कंपनीच्या वाहनांची व्यवस्थित स्वच्छता ठेवणे तसेच ट्रान्सफर स्टेशनवर देखील नियमित स्वच्छता रहावी व त्यातून दुर्गंधी पसरून नागरिकांना त्रास होऊ नये याबाबत कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देश दिले.

परिसरात उभारण्यात आलेल्या ‘आरआरआर’ सेंटरची देखील आयुक्तांनी पाहणी केली. सेंटरचे काम पूर्ण झाले असून तिथे विद्युत व्यवस्था व दर्शनी भागात बोर्ड लावण्याच्या सूचना देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. सतरंजीपुरा झोनमधील ‘ब्लॅक स्पॉट’ नियमित स्वच्छ करून ते पूर्णपणे हटविण्याबाबत कार्यवाहीला गती देण्याचेही निर्देश त्यांनी दिले. नियमित रस्त्यांची सफाई करणे तसेच नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे देखील निर्देश आयुक्तांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोदामेंढीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

Fri Oct 25 , 2024
कोदामेंढी :- येथील वार्ड क्रमांक दोन स्थित आदर्श चौकातील श्री राधाकृष्ण विठ्ठल रुख्माई मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी काकड आरती नंतर झेंडावंदन ,सामुदायिक प्रार्थना जयघोष, राष्ट्रवंदना व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.याप्रसंगी भैय्याजी बावनकुळे ,निलेश बावनकुळे,रुपेश बडवाईक, कवडू बारई ,नरेश हटवार ,गजेंद्र तरटे ,बाळकृष्ण पंचभाई ,चिंतेश्वर ढोमणे ,भगवान मसराम ,लहानु बावनकुळे ,द्रौपदी चौकसे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!