मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ, विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची- राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- विकसित राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांची भूमिका महत्वाची असून विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांना योगदान देता यावे, त्यांचा सक्रिय सहभाग वाढवा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत@२०४७: Voice of Youth’ हा उपक्रम जाहीर केला आहे.असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ सोहळा राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. या प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रदान जगदीश कुमार, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी,प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. प्रसाद करांडे उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, सर्व यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. आजचा क्षण हा केवळ या गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच नाही तर प्राध्यापक, पालक आणि ज्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.त्यांच्यासाठी देखील महत्वाचा क्षण आहे.असे सांगून राज्यपालांनी सर्वांचे अभिनंदन केले.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प केला आहे. भारताच्या सुवर्ण युगाच्या काळात आजची युवा पिढी महत्वाची भूमिका बजावणार, आज मिळालेल्या पदवीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणार आहे. विद्यापीठातून पदवी घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यापीठावर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० देशाच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे बनवले गेले आहे. या शैक्षणिक धोरणाने आकांक्षी उद्दिष्टांसह विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि पुनर्रचना करण्यात आली आहे. विकसित भारतासाठी पुढील दहा वर्षांत विद्यापीठाला भारतातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान प्राप्त होईल यासाठी लक्ष्य निश्चित करावे, विद्यापीठ प्रशासकीय कामकाजात सुधारणा करून विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे प्रामाणिकपणे निराकरण करण्यासाठी प्रणाली विकसित करावी. गाव दत्तक प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे, कौशल्य आधारित उद्योजकता आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केल्या.

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक ओळख निर्माण केली : मंत्री पाटील

मुंबई विद्यापीठाने १६७ वर्षाचा गौरवशाली प्रवास केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवताना अनुभवला आहे आणि तीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा केली आहे. सामाजिक व औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित अनेक उपक्रमांची पायाभरणी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या ज्ञानशाखेला उत्कृष्ट मापदंड निश्चित करता आला आणि उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. जगभरात मुंबई विद्यापीठाने आपली ओळख निर्माण केली आहे.

मुंबई शहर सांस्कृतिक एकात्मता राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिबिंब आहे. येथील अथ:क कार्यसंस्कृती या शहराची वैशिष्ट्ये आहे. या संस्कृतीला आत्मसात केल्यानंतर जगाच्या पाठीवर कुठेही गेला आणि कितीही आव्हाने आली तरी ती आव्हाने यशस्वीपणे पूर्ण करण्याची ताकत या विद्यार्थ्यांकडे असेल.

नवीन शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय संशोधन अनिवार्य करून समाजाच्या आणि मानवतेच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे.यात कौशल्य विकास व रोजगार क्षमता आणि उद्योजकता वाढीला प्रोत्साहन दिले आहे. एका बाजूस ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य तर दुसरीकडे विकसित भारत संकल्पनेत सहभागी होऊन दर्जेदार शैक्षणिक संस्था,कुशल मनुष्यबळ उपलब्धता याकडे अधिक लक्ष दिले आहे. असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

जगदीशकुमार म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवीन संशोधनाला अधिक प्रोत्साहन देण्यात आले आहे. विकासित भारतासाठी युवक, महिला,शेतकरी आणि शिक्षण हे प्रमुख स्तंभ आहेत.याला अधिक विकसित केले तर त्याचे सकारात्मक परिमाण देशाच्या विकासावर होतील.

कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. आता थांबू नका, मानवी कल्याणासाठी चालत राहा असे सांगून मुंबई विद्यापीठाला दिग्गजांची मोठी परंपरा असून त्या परंपरेची जपणूक करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मुंबई विद्यापीठाचा अभिमान वाटेल असे कर्तुत्व गाजवा, असे आवाहन यावेळी केले.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात राज्यपाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे

Thu Feb 8 , 2024
– निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ,नियमित विद्यावेतन, वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करणार मुंबई :- राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून आपला प्रस्तावित संप मागे घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. या आवाहनाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!